पाकिस्तानात उठलेल्या धुळीचा नाशिकलाही फटका….!

नाशिक । प्रतिनिधी

मागील दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला असून कमालीची थंडी अनुभवयास मिळत आहे. तर दुसरीकडे दिवसभर धुळीचा परिणाम वातावरणात दिसत आहे. परिणामी थंडीत वाढ झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान पाकिस्तानात (Pakistan) उठलेल्या धुळीच्या वादळाने आता थेट नाशिककरांच्या (Nashik) उंबऱ्यावर धडक दिल्याने चिंता वाढली आहे. मध्यरात्री ते भल्या पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळत असून काही ठिकाणी धुकेही दिसत आहे. त्यात वाढलेल्या गारठ्याने नागरिक गारठले असून शेतकरी पुन्हा एकदा वातावरण बदलामुळे धास्तावला आहे. या विचित्र हवामानामुळे द्राक्ष, आंबा आणि कांदा पिकावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होते आहे.

पाकिस्तानमध्ये उठलेल्या धुळीच्या वादळामुळे मुंबई, नाशिकला फटका बसत आहे. त्यात अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नाशिकमध्ये पहाटेच हलक्या पावसाने हजेरी लावली. दरम्यान जिल्ह्यातील काही भागात थंड वारे वाहण्यास सुरवात झाली आहे. यामुळे हवेत बाष्प आणि धुलिकन असल्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. आगामी तीन दिवसांत महाराष्ट्र आणि गुजरातमधले किमान तापमान २ ते ४ अंशाने घटून थंडी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिकमधील निफाड पुन्हा एकदा या वातावरण बदलामुळे गारठले आहे. तर आज कुंदेवाडी येथील हवामान विभागात नीचांकी तापमानाची नोंद झाली. परिणामी रात्री पहाटे पेटणाऱ्या शेकोट्या दुपारच्या सुमारासही पेटताना दिसून येत आहे. यासाठी वाफाळलेला चहा आणि गरमागरजम दूध प्यायला नागरिक हॉटेलमध्ये गर्दी करत आहेत. मात्र, अचानक बदलेल्या या वातावरणामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा धास्तावलेला दिसत आहे.

मागील दोन तीन दिवसांत तापमानात प्रचंड घसरण झाली असून कडाक्याची थंडी पडली आहे. मात्र यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सर्दी, ताप, खोकला यांसारख्या आजाराचे प्रमाण वाढलं आहे. दररोज असे रुग्ण आढळून येत आहेत. थंडी अशा आजाराला पोषक ठरत आहे. त्यामुळे सर्वानी काळजी घेण्याची गरज आहे. – डॉ वृषाली व्यवहारे, आरोग्यतज्ज्ञ

धूळ आणि बाष्प यांचे मिश्रण झाल्याने सूर्य प्रकाश कमी पडत आहे. आणि उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे हवेत प्रचंड गारवा निर्माण झालाय. यामुळे थंडीत वाढ झाली आहे. – प्रा. किरणकुमार जोहरे, हवामानतज्ज्ञ