नाशिक । प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात थंडीची मोठी लाट आली असून नाशिक शहरात सोमवारी सर्वाधिक निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. सोमवारी शहरात ६.६ तर निफाडमध्ये ५.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये हुडहुडी वाढली असून आज तर थंडीने सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांमध्ये नाशिकमध्ये राज्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद होत आहे. आठवडाभरापासून तापमानात घट होऊन गारवा निर्माण झाल्याने शहरवासीयांना पुन्हा हुडहुडी भरली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तापमानातं वाढ झाली होती. त्यामुळे थंडी काही अंशी कमी होती. मात्र मागील दोन तीन दिवसांत तापमानात प्रचंड घसरण झाली असून कडाक्याची थंडी पडली आहे.
तर नाशिकचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाड ला देखील कडाक्याची थंडी पडली आहे. सोमवारी निफाड गहू संशोधन केंद्रात हंगामातील सर्वात कमी ५. ३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या मोसमातील सर्वात कमी ५.५ तापमानाची नोंद झाली. हवेत प्रचंड गारवा निर्माण झाल्याने थंडीत वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
दरम्यान नाशिक जिल्ह्यात कडाक्याची थंडीने नागरिक गारठले असून सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत शेकोट्या पेटलेल्या दिसून येत आहे. या थंडीमुळे शेतीवरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. द्राक्ष, गहू आदी पिकांवर थंडीचा परिणाम जाणवू लागला आहे. नाशिक आणि निफाड मध्ये यंदाच्या मोसमातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आल्याने पुढील काही दिवस अशीच राहणार असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.