तेवढे बेळगाव देऊन टाका आणि विषय संपवा : शरद पवार

मी तुमची इतकी उद्घाटने केली, त्यासाठी मी काहीच मागत नाही. तेवढे बेळगाव देऊन टाका आणि विषय संपवून टाका असे मिश्कील विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. वैद्यकीय क्षेत्रात मोठे नाव असलेले आणि कर्नाटकचे रहिवाशी प्रभाकर कोरे यांच्या नव्या खासगी रुग्णालय उद्घाटन प्रसंगी शरद पवार बोलत होते. डॉ. कोरे यांनी काही नवीन केले की, ते मला उद्घाटनाला बोलावतात. त्यामुळे मी डॉक्टरांना म्हणतो की, मी तुमची इतकी उद्घाटने केली, त्यासाठी मी काहीच मागत नाही. तेवढे बेळगाव देऊन टाका आणि विषय संपवून टाका असे शरद पवार म्हणाले आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला.

पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये प्रभाकर कोरे यांच्या खासगी रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. ते कर्नाटकात राहतात. ते शरद पवार यांचे घनिष्ट मित्रही आहेत. आजवर शरद पवार यांनी कोरे यांच्या संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केलेले आहे. तसेच काल देखील पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार यांच्या हस्ते या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले.

त्यावेळी शरद पवार यांनी भाषण केले. ते म्हणाले, कोरे यांनी काही नवीन काढलं मला उद्घाटनला जावं लागतं. मग ते कर्नाटकात असो की महाराष्ट्रात असो. ही अनेक वर्षाची परंपरा आहे. नेहमीच त्यांना सांगतो, तुमची इतकी उद्घाटनं मी केली. मी काही मागत नाही. तो बेळगाव देऊन टाका आणि प्रश्न संपवून टाका. या विधानाने उपस्थितांमध्ये हशा पिकला.

पुढे बोलताना पवार म्हणाले, ते नेहमी सांगतात अख्खा कर्नाटक तुम्ही घ्या. पण बेळगावची मागणी करू नका. यातील चेष्टेचा भाग सोडून द्या. आज बेळगावच्या भागातील जनतेच्या हिताची जपणूक कोरे यांची संस्था करत आहे. वैद्यकीय क्षेत्रात ज्या काम करणाऱ्या उत्तम संस्था आहेत त्यात कोरे यांची संस्था आहे. ही संस्था बेळगावमध्ये चांगलं काम करत आहे. त्याचा परिणाम म्हणजे बेळगावमधील सर्व घटकांचा यांच्या संस्थेवर विश्वास आहे, असे शरद पवार म्हणाले.