नाशिक । प्रतिनिधी
समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराजांना कोणी विचारलं असत” अस आक्षेपार्ह वक्तव्य करत राज्यपालांनी समस्त महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे राज्यपालांना तातडीने हटवावे अशा मागणीचे ०६ हजार पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून पाठविणार असल्याची माहिती शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिली आहे.
औरंगाबाद मधील कार्यक्रमावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरु विषयीच महत्व सांगताना महाराष्ट्र राज्याचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. गुरुमुळे शिष्य घडत असतो असे सांगताना महाराजांचा एकेरी उल्लेख करत “समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराजांना कोणी विचारलं असत” अस वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांवर राजमाता जिजाऊनी संस्कार केले त्या आधारावर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू राजमाता जिजाऊ, संत तुकाराम महाराज, दादाजी कोंडदेव हे होते. प्रसिद्ध इतिहास लेखक बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकात सुद्धा समर्थ रामदास व छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट कधीच झाली नसल्याचा उल्लेख आहे. असे असताना महाराष्ट्र राज्याचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्याचे राज्यपाल हे राज्यपाल राहायच्या लायकीचे नाही. राज्यपालांना हटविण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस सहा विभागातून प्रत्येकी हजार याप्रमाणे सहा हजार पत्र राष्ट्रपतींना पाठविणार असल्याचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.