प्रेमसंबंधातून वारंवार लग्नाचा तगादा लावल्याने एकाची आत्महत्या

नाशिक | प्रतिनिधी
वारंवार लग्नाचा तगादा लावून मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी एका ४२ वर्षीय महिला तिचा मुलगा आणि त्याचा साथीदार अशा तिघांवर आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील नववा मैल, येथील पेट्रोल पंपा जवळ मोकळ्या जागेत एका इसमाचा बेवारस मृतदेह आढळून आला होता. याबाबत काहीही एक माहिती मिळत नव्हती. त्यांनतर पोलिसांनी पथक नेमले. या पोलीस पथकाने चक्रे फिरून गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळून प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न केला.

यावेळी सदर मयत हा मूळचा भुसावळ जळगाव जिल्ह्यातला असून सध्या ओझर येथे वास्तव्यास असून त्याचे नाव रमेश रवींद्र मोरे असे असल्याचे समोर आले. प्रकरणाबाबत गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलीस तपासात मयत याचे एका महिलेसोबत गेल्या वर्षभरापासून प्रेम संबंध होते, आणि तो संशयित महिलेसोबतच ओझर राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

दरम्यान सदर महिलेकडून या इसमाला वारंवार लग्न करण्याचा तगादा आणि मानसिक त्रास दिला जात होता. याला कंटाळून रवींद्र मोरे याने ओझर येथे राहत असलेल्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती न देता पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने महिलेचा मुलगा आणि त्याचा मित्र याने मयत रवींद्र याला मोटार सायकल वर बसून त्याचा मृतदेह नवव्या मैल येथील पेट्रोल पम्प येथे आणून टाकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणी आडगाव पोलिसांनी या प्रकरणातील महिला, तिचा मुलगा तुषार गांगुर्डे आणि त्याचा मित्र आकाश पवार याला अटक केली आहे.