महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त

नाशिक | प्रतिनिधी

उद्या महाशिवरात्र असल्याने त्र्यंबकेश्वर मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सदर पोलीस बंदोबस्ताची पूर्वतयारी व नियोजनासंदर्भात पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी बंदोबस्ताचे सर्व अधिकारी व अंमलदार यांचा आढावा घेऊन सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर पोलिस ठाणे हद्दीत आठ पोलिस, ८० पोलीस अंमलदार ४१ होमगार्ड, तसेच एक एसआरपीएफ प्लाटून बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.

यावेळी त्र्यंबक मंदिर परिसर, कुशावर्त कुंड व शहरातील सर्व धार्मिक स्थळांवर तैनात करण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताची पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पाहणी करून चोख बंदोबस्त करण्याच्या सूचना केल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निर्गमित केलेल्या आदेशांचे पालन करावे याबाबत नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात आले आहे.