विकेंडला हरिहर किल्ल्यावर गर्दीचा महापूर

नाशिक । प्रतिनिधी

पर्यटनस्थळे खुली झाल्यानंतर त्र्यंबकेश्वरजवळील हरिहर किल्ला उर्फ हर्षगडावर भटकंती तसेच गिर्यारोहणासाठी गर्दी होत आहे. गिरीप्रेमी आणि पर्यटकांबरोबरच तसेच सामान्य जण आणि खासकरून तरुणाईचा यात समावेश आहे. चढाईसाठी अतिशय अवघड असलेला हा किल्ला सर करताना तरुणाई सुरक्षेची खबरदारी घेत नसल्याने तेथे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

नाशिक जिल्ह्यातील अवघड प्रकारांतील असलेला हरिहर किल्ला ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस आहे. नाशिकसह, नगर, ठाणे आणि मुंबईतून पर्यटक तेथे असतात. शनिवारी आणि रविवारी या किल्ल्यावर जाण्यासाठी परिसरात तरुणाईची मोठी वर्दळ दिसून येत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने पर्यटनस्थळे खुली करण्यात आली आहेत. यामुळे पर्यटकांची पाऊले त्र्यंबककडे वळली आहेत. अशातच संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला हरिहर किल्लाही त्र्यंबकमध्ये येत असल्याने आता या किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी होत आहे.

सध्या पयर्टकांचा ओघ वाढल्याने किल्ल्याकडे जाणाऱ्या अरुंद पायऱ्यांवरून एकावेळी दोन पर्यटक चढताना व उतरतानाचे दृश्य पहायला मिळते आहे. पायऱ्यांवर खाचा करण्यात आल्या आहेत. त्या खाचांना पकडूनच चढाई करावी लागते. मात्र असे असतानाही पर्यटकांची वीकेण्डला गर्दी होते आहे. त्यामुळे रविवारी या ठिकाणी मोठी गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर किल्ल्यावरील वाढत्या गर्दीकडे स्थानिक वनविभागाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे गिर्यारोहकांनी सांगितले.

पर्यटक या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी थांबतात. त्यामुळे आपसूक रस्ता अडवला जातो. परिणामी गर्दी होते. वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून दोन स्वयंसेवक आणि वन खात्याचे दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करून गर्दी कमी करण्याचा प्रयत्न करू. – राजेंद्र पवार, वन परिक्षेत्र अधिकारी त्र्यंबकेश्वर