कठीण परिस्थिती! मात्र तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय

नाशिक । प्रतिनिधी

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी राज्यात तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, वाढती गर्दी आणि रुग्णसंख्या पाहता निर्बंध अधिक कडक करण्याचा विचार राज्यसरकारने केला आहे.

राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होत असून मंगळवारी कोरोनाच्या तब्बल १८ हजारांच्या वर नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने चाललं आहे की काय अशी शंका उपस्थित होते आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारची महत्त्वाची बैठक घेण्यात आली.. यावेळी राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी राज्यात तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, वाढती गर्दी आणि रुग्णसंख्या पाहता निर्बंध अधिक कडक करण्याचा विचार राज्यसरकारने केला आहे.

राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आज बुधवारी (दि. ०५) हि बैठक बोलावली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव, आरोग्य विभागाचे अधिकारी, वित्त विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान गेल्या काही दिवसांत राज्यात कठीण परिस्थिती निर्माण झाली असून बैठकीत कोरोनाच्या वाढलेल्या रुग्ण संख्येवर चर्चा झाली. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे सरकार चिंतेत असून संसर्ग टाळण्यासाठी नवीन काय आणि कसे निर्बंध लादले पाहिजेत यावर विचारमंथन करण्यात आले.

महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या नऊ हजारा वरून १८ हजारा वर पोहोचली आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स मध्ये होणारी गर्दी कशी कमी करता येईल, यावरही या बैठकीत चर्चा झाली. धार्मिक स्थळे, सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करण्यासाठी काय पावले उचलली पाहिजेत, यावरही चर्चा झाली.

राज्यात सध्या तरी लॉकडाऊन लावण्यात येणार नसून निर्बंध कडक करण्यात येतील असं आरोग्यमंत्र्यांनी जरी स्पष्ट केलं असलं तरी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. याच मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत मंत्रालयामध्ये महत्त्वाची बैठक घेण्यात आली. दरम्यान या बैठकीत तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.