Home » स्वतःला व्यक्त करण्याची संधी कधीच सोडू नका – ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर

स्वतःला व्यक्त करण्याची संधी कधीच सोडू नका – ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी
मराठी साहित्य संमेलनाच्या या आधीच्या ९३ संमेलनात जे उपक्रम राबविले गेले नाही, असे नाविन्यपूर्ण उपक्रम आपण कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राबविण्यात येत आहे. पहिल्यांदाच साहित्य संमेलनाच्या इतिहासात बाल साहित्य मेळाव्याचा समावेश करण्यात आला आहे. बालसाहित्य मेळाव्याची ही परंपरा यापुढील होणाऱ्या साहित्य संमेलनात देखील कायम राहील असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

मेट भुजबळ नॉलेज सिटी आडगाव नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बाल साहित्य मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या बालकवी मेळाव्याची बाल साहित्य पूजनाने करण्यात आली.

यावेळी दिलीप प्रभावळकर म्हणाले की, आजकालची मुलं अधिक स्मार्ट झाली आहे. प्रत्येकात कुठलीना कुठली कला असते ती बाहेर पडली पाहिजे. आपल्यात जी कला आहे ती दाबून न ठेवता व्यक्त करावी यामध्ये पालकांनी देखील विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. वाचलेलं चांगल साहित्य लिहायला प्रेरणा देते. बालकांनी साहित्याशी दोस्ती करावी. त्यांनी पुस्तकाची संगत साहित्याची साथ सोडू नये असे सांगत दररोज तीनचार ओळींचे लिखाण करत पुस्तकाची तीन चार पाने दररोज वाचावी असे आवाहन त्यांनी केली.

यावेळी दिलीप प्रभावळकर यांनी उपस्थित बालकांशी संवाद साधला. बालकांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रभावळकर यांनी दिली दिलखुलास उत्तरे देत त्यांनी चित्रपटात चिमणराव, बोक्या सात बंडे, तात्या विंचू, चौकट राजा, नारबा, आबा टिपरे यासह केलेल्या विविध भूमिकाबाबतचा पट मुलांसमोर उभा केला. तसेच बालकुमार साहित्य मेळाव्यात हजर राहण्याची संधी मिळाली याचा आनंद होत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजित बालसाहित्य मेळाव्यात लिटिल चॅम्प फेम ओमकार कानिटकर व जय गांगुर्डे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी विविध गाण्याचे सादरीकरण यावेळी केले. याला बालकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

बालसाहित्य मेळाव्यात बाल चित्रकारांनी रेखाटली सुंदर चित्रे

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात इतिहासात पहिल्यांदाच बालसाहित्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या बाल साहित्य मेळाव्यात अनेक बाल चित्रकारांनी आपला सहभाग नोंदविला. यावेळी या बालकरांनी विविध सुंदर चित्रे रेखाटली. या बाल मेळाव्यात ३ वर्षाची ओजस्वी काने ही चिमुकली चित्र कलाकार देखील सहभागी झाली. तसेच इयत्ता ५ वीत शिकणारा मयुरेश आढाव या विद्यार्थ्याने रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन याठिकाणी लावण्यात आले होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ व ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!