मारहाणीचा वचपा काढण्यासाठी बस स्थानकातून तरुणाचे अपहरण

नाशिक : जिल्ह्यात अपहरणाचा घटनांना मध्ये वाढ होत आहे. सिन्नर येथील अपहरणाची (Kidnapping) घटना ताजी असताना लासलगाव बसस्थानकातून (Lasalgaon Bus Stand) मुलीच्या प्रकरणातून एका तरुणाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपहरणाची थरार बस स्थानकात असलेल्या सीसीटीव्ही (CCTV Camera) कॅमेरात कैद झाल्याने सीसीटीव्हीच्या मदतीने अवघ्या चार तासात लासलगाव पोलिसांना अपहरणाचा तपास लावण्यात यश आले आहे. तर याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले असून तर तीन जण अद्यापही फरार आहे. मात्र या घटने मागचे धक्कादायक कारण समोर आले आहे.

मुलीच्या प्रकरणातून मारहाण झाल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी लासलगाव बस स्थानकातून तरुणाचे अपहरण करत मारहाण केल्याचा हा प्रकार असून याप्रकरणी पोलिसानीं दिलेली माहिती अशी की, गेल्या ८ जानेवारी रोजी निफाड तालुक्यातील देवगाव फाटा येथे मुलीच्या प्रकरणात त्या मुलीच्या नातेवाईकांनी एकास मारहाण केली होती. या मारहाणीचा वचपा काढण्यासाठी सदर इसमाने एका मुलीचा मोबाईल नंबर असल्याचे भासवत व्हाट्सअप वर तीन दिवस मारहाण करणाऱ्या तरुणाला मेसेज केले आणि आज सकाळी लासलगाव बस स्थानकावर भेटण्यासाठी बोलवले.

सदर तरुण आणि त्याचा मित्र मोटरसायकल वरून आले होते. लासलगाव बस स्थानकाच्या आवारात उभे असताना मारहाण करणाऱ्या तरुणाचे एका ओमिनी व्हॅन मधून अपहरण करण्यात आले. त्यानंतर तुयाला लासलगाव रेल्वे गेट जवळील साईनगर येथे काटेरी झुडपात उतरून देत लोखंडी रॉड आणि लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली आणि नंतर सोडून देत संशयितांनी पळ काढला. या घटनेची माहिती लासलगाव पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत लासलगाव बस स्थानकावरील सीसीटीव्ही कॉमेऱ्याच्या मदतीने घटनेचा तपास सुरु केला. अवघ्या चार तासात या घटनेचा तपास लावण्यात लासलगाव पोलिसांना यश आले.

दरम्यान याप्रकरणी अनिल माळी या फिर्यादीच्या जबाबावरून लासलगाव पोलीस ठाण्यात अपहरण व दंगलीचा सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात येवला तालुक्यातील संशायित आरोपी सह त्याच्या चार मित्रांना निफाड तालुक्यातून ताब्यात घेतले आहे. तर तीन जण अद्यापही फरार आहे. याप्रकरणी फरार तिघांचा लासलगाव पोलीस शोध घेत आहे. दरम्यान लासलगाव बसस्थानकाच्या परिसरात झालेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा टवाळक्याना पोलिसाचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.