नाशिक । प्रतिनिधी
भारतीय संघाचा तडाखेबाज सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) याच्या शिरावर आता नवी जबाबदारी आली आहे. पंजाब संघाने रिटेन न केल्यानंतर केएल राहुलसाठी नेतृत्व आणि कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी नवी जागा खुली झाली आहेे. आयपीएल २०२२ मध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या ‘लखनौ संघाने’ केएल राहुलला रिटेन केले आहे.
आयपीएल २०२२ मेगा लिलावापूर्वी केएल राहुल हा लखनौच्या आयपीएल संघात सामील झाला असून त्याला सर्वाधिक १७ कोटी रुपयांची बोली लागली आहे. तसेच मार्कस स्टॉइनिस आणि रवी बिश्नोई यांची देखील निवड झाली आहे. स्टॉइनिसला ९.२ कोटी रुपये तर बिश्नोईला ४ कोटी रुपये मिळतील. तर महत्वाचे म्हणजे केएल राहुलची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शुक्रवार (दि. २१) रोजी लखनौ (Lucknow Team ipl) आणि अहमदाबाद या संघांसाठी रिटेन केलेल्या खेळाडूंची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यासाठी अखेरची मुदत होती. त्यामुळे शुक्रवारी रात्री उशीरा दोन्ही संघांनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे, त्यांना दिलेली रक्कम आणि त्यांचे संघातील स्थान याबाबत घोषणा केली. यात लखनौ संघाचे संघमालक गोयंका यांनी केएल राहुल हा लखनौ संघाकडून रिटेन केलेला क्रमांक एकचा खेळाडू असून त्यालाच यष्टीरक्षण आणि संघांचे नेतृत्वपद देत असल्याचेही सांगितले.
केएल राहुलने २०१३ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याचा पहिला संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु होता. राहुल २०१४ मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग बनला. त्यानंतर २०१८ च्या लिलावात किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला ११ कोटी रुपयांना विकत घेतले. आणि येत्या २०२२ च्या आयपीएल मध्ये तो लखनऊ संघांची धुरा सांभाळणार आहे.