चला चला त्र्यंबकला, निवृत्तीनाथांच्या भेटीला..!

नाशिक । प्रतिनिधी

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी त्र्यंबक नाशिक रस्त्याला तुरळक दिंड्याचे आगमन पाहायला मिळत आहे. यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा बंद असल्याने वारकऱ्यांचा हिरमोड झाला असला तरी निवृत्तीनाथांच्या भेटीला काहीसे भाविक दाखल होत आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून त्र्यंबकेश्वर यात्रा बंद असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून मार्गक्रमण करणाऱ्या हजारो दिंड्यां दिसेनाशा झाल्या आहेत. कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाने यंदाही त्र्यंबकेश्वर यात्रेवर बंदी आणली आहे. त्यामुळे दरवर्षी वारकरीमय होणारे नाशिक त्र्यंबक शहर सुने सुने झाले आहे. हाती टाळ , खांद्यावर भगवी पताका, टाळ-मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष हरवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान त्रंबकेश्वर येथे २८ जानेवारीला संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा होणार होती. मात्र प्रशासनाने यावर निर्बंध आणल्याने त्र्यंबकेश्वर परिसर सुना झाला आहे. तर हजारोच्या संख्येने येणारे भाविक यंदाही थोड्याच संख्येने येत आहे. सध्या रस्त्याने मोजक्याच दिंड्या, पायी दिंड्या दिसत आहेत. वारकरी देखील मोजकेच येत असून यंदाही निवृत्तीनाथ भेटीचा आनंद हिरावून घेतल्याचे वारकऱ्यांनी सांगितले.

दरवर्षीं राज्यातून वारकरी शहरात दाखल होतात. त्यामुळे शहरातील वातावरण विठूनामाच्या गजराने दुमदुमून जाते. अशावेळी दिंड्यांचे रथ शहरामध्ये जागोजागी थांबलेले दिसून येतात तर काही दिंड्या त्र्यंबकेश्वराकडे मार्गस्थ होतात. तर काही वारकरी भजनात दंग होत हाती ध्वज घेऊन टाळ-मृदुंगाच्या गजरात मुखी विठ्ठलाचा आणि ज्ञानोबा-माऊली तुकारामाचा जयघोष करीत रामकुंडावर दर्शनासाठी जातात. मात्र यंदा हे चित्र नसल्याने वारकरी भाविकांचा हिरमोड झाला आहे.