नाशकात बिबट्याचा धुमाकूळ; २४ तासात ३ बिबटे कैद

नाशिक : जिल्ह्यात मानवी वस्ती परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. गेल्या २४ तासात नाशिक जिल्ह्यात ३ बिबट्यांना वनविभागाने पिंजऱ्यात कैद केले आहे. बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान आज निफाड परिसरातील म्हाळसाकोरे, देवळाली कॅम्प आणि वडनेर दुमाला भागात बिबट्यांना जेरबंद करण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वीच निफाड परिसरातील म्हाळसाकोरे भागात बिबट्याचा हल्ल्यात एका लहान मुलाचा मृत्यू झाला होता. पाच वर्षाच्या चिमुकल्याला आईच्या हातातून हिसकावत बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाला होता.

घडलेली घटना अशी की, शेतातील द्राक्ष बागेचे काम आटपून घरी परतणाऱ्या आईच्या हातातील पाच वर्षाच्या चिमुकल्यास हिसकावून त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे गावाजवळ घडली.

म्हाळसाकोरे येथे सुरगाणा तालुक्यातील म्हैसखडक येथील शेतमजूर द्राक्ष कामासाठी मुलाला घेऊन द्राक्ष कामासाठी गेले होते. सायंकाळी आई शेतातून परतत असताना तिच्या सोबत हा चिमुकला होता. वाटेने चालत असताना त्याचवेळी अचानक मक्याच्या शेतात दबा धरून असलेल्या बिबट्याने मुलाला आईच्या हातातून हिसकावून घेऊन शेतात ओढून नेले. त्याठिकाणी बिबट्याने चिमुकल्यावर जोरदार हल्ला करून गंभीर जखमी केले. आईने आरडाओरडा केला. आजूबाजूचे जवळपास ५० शेतकरी जमा झाले. शेतकऱ्यांनी मक्याच्या शेताकडे धाव घेतली असताना बिबट्याने मुलाला सोडून पळ काढला. मात्र, मुलाचा जागीच मृत्यू झाला होता. अशा घटनांनी शेतकरी, नागरिकांची भीती वाढत आहे.

निफाड परिसरातील म्हाळसाकोरे येथे बिबट्याला जेरबंद करण्यात आले असून जिल्ह्यात मानवी वस्तीकडे बिबट्यांचा वावर वाढल्याने चिंतेत भर पडली आहे.

दरम्यान नाशिक शहरातील देवळाली कॅम्प परिसर देखील आता बिबट्याच्या संचाराने चर्चेत येत आहे. दारणा लगत नेहमीच बिबट्याचा संचार दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि पंपिंग स्टेशनच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान देवळाली कॅम्प परिसरातील पगारे चाळ परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला होता. वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रात्री आठच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला. 

तर वडनेर दुमला येथे पहाटे रेंज रोडवरील एका शेतात एक बिबट्या जेरबंद झाला आहे. रेस्क्यू टीमने पिंजऱ्यासह बिबट्यास नाशिक येथे सुरक्षित घेऊन गंगापूर रोपवाटिका येथे ठेवले आहे. मात्र नेहमीचा बिबट्याचा संचार चिंता वाढवणारा आहे.