पुनद खोऱ्यातील देसराणेत बिबट्याची दहशत कायम

नाशिक । प्रतिनिधी

पुनद नदी परिसरातील देसराने येथील शेतकरी माणिक रामदार पवार यांच्या शेतातील शेडमध्ये बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन महिन्याची गाभण शेळी जागीच गतप्राण झाली आहे. यामुळे परिसरात गेल्या काही दिवसांपासून भीतीचे वातावरण आहे.

कळवण तालुक्यातील पुनदखोऱ्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत पसरली आहे. पुनद खोऱ्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. रविवार (दि.२०) रोजी देखील शेतकरी सागर अशोक हिरे हे रात्रीच्या वेळेत कांदा पिकाला पाणी भरत असतांना बिबट्याने दर्शन दिले होते. यावेळी त्यांनी तात्काळ घराकडे धूम ठोकल्याने जीव वाचल्याचे त्यांनी सांगितले. तसेच खैराड शिवार नाळीद येथील शेतकरी राजेंद्र भन्सी यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला केल्याने शेळीचा जीव गेला होता.

तसेच ब्राह्मणे शिवारातील शेतकरी बाळासाहेब सहादू हिरे यांच्या वासरावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात वासरू गंभीर जखमी असून हिरे यांनी वेळीच आरडाओरडा केल्याने बिबट्याने तिथून पळ काढला.

दरम्यान देसराने येथील घटनेनंतर पशुधन विकास अधिकारी डॉ. भांगरे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता त्या शेळीच्या पोटात दोन पिल्ले असल्याचे दिसून आले. त्यामुळे गतप्राण झालेल्या शेळी मालकास नुकसान भरपाई मिळावी व वनविभागाने परिसरात गस्त वाढवावी तसेच परिसरात ठिकठिकाणी पिंजरा बसविण्यात यावा अशी मागणी परिसरातील शेतकरी बांधवांनी केली आहे.