नाशिक मनपा पंचवटीत साकारणार दोन उड्डाणपूल

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणांचा धडाकाच लावणाऱ्या सत्तारूढ भाजपने आता आगामी अर्थसंकल्पाबाबत हेच धोरण अवलंबले असून आता नाशिक शहरात एडवेंचर पार्क साकारण्यात येणार आहे.

याशिवाय पंचवटीत दिंडोरी रोड आणि पेठ रोडवर उड्डाणपूल साकारण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे तर लॉजिस्टिक पार्कसाठी ऐंशी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती गणेश गीते यांनी ही माहिती दिली आहे. महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी निवडणुकीमुळे आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी यंदा जानेवारी महिन्यातच अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी केली होती. मात्र त्यास विलंब झाला आणि फेब्रुवारीच्या प्रारंभी २ हजार २२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. सभापती गणेश गीते यांनी समितीच्या बैठका घेऊन त्यात सुमारे अडीचशे कोटी जमा बाजूची भर घातली असून त्यामुळे २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प अडीच हजार कोटींवर गेला आहे.

महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर सभापती गणेश गीते यांनी अनेक योजना वाढवल्या असून एडवेंचर पार्क साकारण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. गंगापूर रोडवरील आसाराम बापू आश्रम जवळील जागेत ने पार्क साकारण्यात येणार आहे. गंगापूर रोड वरील त्याचबरोबर शहरातील मायको सर्कल आणि मुंडेवाडी या दोन ठिकाणी अडीचशे कोटी रुपयांच्या पुलाचे प्रकरण गाजत असतानाच आणखी दोन उड्डाणपूल पंचवटी साकारण्यात येणार आहेत. दिंडोरी रोड आणि पेठरोडवर हे पुल साकारण्यासाठी यापूर्वीच चर्चा झाली होती , मात्र सध्या दोन पूल उभे राहत असल्याने पंचवटीतील पुलांबाबतही चर्चा सुरू झाली आहे.