एमपीएससीकडून सी सॅट पेपर संदर्भात महत्वाचा निर्णय

नाशिक । प्रतिनिधी
राज्य लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दोन पेपर पैकी सीसॅट (C SAT) आता पात्रतेसाठीच असणार असल्याचे परिपत्रक राज्य लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळ (MPSC Website) वर प्रकाशित झाले आहे. ३३% गुण या पेपरसाठी अनिवार्य असणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) पूर्व परीक्षेत उमेदवारांना ‘सी-सॅट’ पेपर द्यावा लागतो. त्याच धर्तीवर ‘एमपीएससी’नेही ‘सी-सॅट’ पेपर सुरू केला. मात्र, यूपीएससीच्या परीक्षेत सी-सॅट केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरला जात असताना एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. उत्तीर्णतेच्या अटीमुळे नुकसान होत असल्याचे सांगत राज्यभरातील उमेदवारांकडून सी सॅट पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याची मागणी करण्यात येत होती. त्या बाबत स्पर्धा परीक्षा उमेदवारांकडून निवेदन देण्यासह आंदोलनेही करण्यात आली.

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत सी-सॅट पेपर आता पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात आयोगाकडून नियुक्त समितीच्या शिफारसीनुसार आयोगाने निर्णय घेतला आहे. आता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल.

या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी आयोगाकडून याबाबत समितीची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या समितीच्या बैठकाच झाल्या नसल्याचे समोर आले होते. आता या समितीने अहवाल तयार करून एमपीएससीला सादर केला आहे. समितीच्या शिफारसी आयोगाने स्वीकारल्या आहेत. त्यानुसार सी सॅट आता पात्रतेसाठी ग्राह्य धरला जाणार आहे.