नाशिक । प्रतिनिधी
सर्वत्र लसीकरण मोहीम असतांना मालेगाव शहरातील लोकप्रतिनिधीच याबाबत उदासीन असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसऱ्या लाटेनंतर नाशिक जिल्ह्यात लसीकरणाला वेग आला असताना मालेगावातील नगरसेवकच लसीकरण करत नसल्याने नागरिक कसे करतील असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
एकीकडे कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याने जगभरात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे सर्वच यंत्रणा कामाला लागली असतांना दुसऱ्या लाटेत कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात मात्र लोकप्रतिनिधीच याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या अत्यल्प लसीकरणामुळे महापालिकेची महासभा ऑनलाईन घेण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे.
दरम्यान मालेगाव महानगरपालिकेची महासभा ऑफलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. मात्र मनपातील अनेक नगरसेवकांनी लस घेतली नसल्याने ऑफलाइन महासभा स्थगित करण्याचा सर्व पक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडून नगरसेवकांच्या लसीकरणाची माहिती घेण्याचे काम सुरू असून नवीन कोविड व्हेरियंट संदर्भात उपाययोजना संदर्भात शासन नवीन नियमावली करीत आतांना मालेगांवला मात्र लोकसेवकांनीच पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान शहरातही लसीकरणाचा टक्का अत्यल्प असून आतापर्यंत पहिला 32 टक्के दुसरा डोस फक्त 11 टक्केच लोकांनी घेतल्याचे महिला पदाधिकाऱ्याने सांगितले. त्यातच नगरसेवक लस घेत नसल्याने नागरिकांना कोण प्रोत्साहित करेल असा प्रश्न त्यांनी यावेळी केला.