नाशिक जिल्ह्यात आठवडाभर ढगाळ वातावरण; ‘या’ भागात पाऊस पडण्याची शक्यता

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यामध्ये मंगळवार (दि. ३०) पासून वातावरण जास्त ढगाळ होण्यास सुरू होईल. दि. ३०, १, २ तारखेस वातावरण पूर्णतः ढगाळ राहील. बुधवारी पूर्णतः वातावरण ढगाळ राहून दिवसभर गारवा टिकून राहिल. बुधवार संध्याकाळपासून ते गुरुवार सकाळ पर्यंत नाशिक जिल्ह्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान आज रोजी (दि.३०) केरळच्या किनारपट्टीपासून 450 किलोमीटर अंतरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्मण होऊन त्याचे वादळात रूपांतर होणार आहे. हे वादळ वेगाने प्रवास करत दि.०२ डिसेंबर रोजी सकाळी कोकणच्या किनारपट्टीवर पोहोचेल. याच दरम्यान बंगालचा उपसागर आणखी एक कमी तीव्रतेचे वादळ तयार होईल हे वादळ पाच ते सहा डिसेंबर दरम्यान उशिरा विशाखापटन्नम जवळ धडकण्याची शक्यता आहे. हे वादळ विशाखापट्टणमला धडकल्यानंतर या वादळाची तीव्रता कमी होईल. अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर पाऊसही होण्याची शक्यता आहे.

दि. ०१ डिसेंबर रोजी सकाळी नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलकी टिपटिप काही मिनिटांच्या साठी होऊ शकतो. दुपारनंतर वातावरण पुन्हा जास्त ढगाळ होण्यास सुरू होईल. नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी आणि सिन्नर तालुक्यामध्ये सकाळपासूनच पावसास सुरुवात होईल. त्यानंतर हळूहळू निफाड, चांदवड, सटाणा, नाशिक जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दिंडोरी, सप्तशृंगी गडाचा परिसर, वनी, चांदवड, मालेगाव या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग मोहाडी, गिरणारे या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. संध्याकाळी उशिरा नाशिक जिल्हयाच्या पुर्व भागात पावसाचा जोर वाढू लागेल.

तर गुरुवारी (दि. ०२) सकाळच्या सत्रामध्ये नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेकडील भाग, मालेगाव, नांदगाव, येवला, निफाड तालुक्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर अधिक राहू शकतो. गुरुवारी सकाळी पूर्व भागातून वातावरण स्वच्छ होण्यास सुरू होईल. नाशिक, दिंडोरी मध्ये हलका पाऊस आणि त्यानंतर हळूहळू उघडीप मिळण्यास सुरू होईल. गुरुवारी संध्याकाळी उशिरा आणि शुक्रवारी सकाळी बहुतांश ठिकाणी हलकी टीपटिप होऊ शकते. शुक्रवार (दि.03) नंतर ढगांची उंची आणि गर्दीही कमी होईल आणि वातावरण स्वच्छ होण्यास सुरवात होईल.