सुरगाणा तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या पश्चिम वाहिनी नद्यांवरील प्रस्तावित केलेला वळण लिंक योजना प्रकल्प तत्काळ रद्द करण्याची मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने येथील तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून करण्यात आली आहे. आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. विविध मागणींचे निवेदन यावेळी उपस्थित तहसिलदार सचिन मुळीक यांना देण्यात आले.
‘समुद्राचे खारे पाणी गोडे पाणी करण्याची जी ठिकाणं निवडली आहेत ती भोळ्या भाबड्या आदिवासींची आहेत. केंद्र सरकारचे धोरण हे आदिवासींच्या विरोधातील असून आदिवासींना बुडविण्याची व्यवस्था ह्या धोरणाची आहे. त्यामुळे तालुक्यातील पश्चिम वाहिनी असलेल्या नार, पार, तान व मान या नद्यांवर प्रस्तावित केलेल्या वळण लिंक योजना प्रकल्प अंतर्गत चिंचला, इवरदहाड, सोनगीर, उंबरठाण, मिलनपाडा, सारणेआवण, प्रतापगड, घोडी, राक्षसभुवन या ठिकाणचे वळण लिंक तत्काळ रद्द केले जावेत, त्यापेक्षा स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना लाभदायक ठरणारे साठवण बंधारे बांधण्यात यावेत. त्यासाठी लघु पाटबंधारे योजना प्रस्तावित असलेल्या सतखांब, वांगण (सु.), सोनगीर, मालगोंदे, बाळओझर, वाघधोंड, उंबरविहिर, सालभोये, अलंगुण या योजना त्वरित मंजूर कराव्यात, रोजगार हमी योजनेअंतर्गत पंगारबारी, बेंडवळ, गळवड, भोरमाळ, ओरंभे, कोठुळा, चिकाडी, डोल्हारे, तळपाडा – १, मोठामाळ, वाळुटझिरा, साबरदरा, आवळपाडा, गहाले, टापूपाडा, बर्डीपाडा, रोकडपाडा, राक्षसभुवन, ठाणगाव, भेगू सावरपाडा, सुकतळे, मास्तेमाणी, म्हैसमाळ (करकवली नाला) या ठिकाणी अपुर्ण असलेले पाझरतलाव लवकरात लवकर मंजूर करून पुर्ण करावेत. १९७२ च्या दुष्काळ मधील रोजगार हमी योजनेअंतर्गत ३४ पाझरतलावांचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र त्यावेळी वनहरकतीमुळे हे पाझरतलाव अपुर्णावस्थेत आहेत. हे सर्व पाझरतलाव पुर्ण करावेत. अतिवृष्टीमुळे भात, नागली, वरई, तुटलेले बांध आदींची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तातडीने द्यावी’, अश्या मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.
यावेळी तालुकाध्यक्ष चिंतामण गावित,उपाध्यक्ष रजित गावित युवा अध्यक्ष राजेंद्र पवार, गोपाळ धुम, सुवर्णा गांगोडे, नगरसेविका जयश्री शेजोळे, यशवंत राऊत, सरपंच राऊत आदींसह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव, शेतकरी उपस्थित होते. विविध मागणींचे निवेदन यावेळी उपस्थित तहसिलदार सचिन मुळीक यांना देण्यात आले.