परिश्रम, जिद्द बाळगल्यास क्रीडा क्षेत्रात यश निश्चित; आमदार मंजुळा गावित

विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर क्रीडा क्षेत्रात नाव कमवायचे असेल तर कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी बाळगल्यास निश्चितच जीवनात यश मिळते असे प्रतिपादन साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित यांनी जिल्हा परिषद शाळा देवलदरी येथे शिक्षण परिषदेत शाळेतील माजी विद्यार्थ्यीनी राष्ट्रीय खोखो पटू कौशल्या पवार हिच्या सत्कार प्रसंगी केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मांगीलाल पवार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मंजुळा गावित, डॉ.तुळशीराम ठाकरे, राम चौरे,विस्तार अधिकारी नरेंद्र कचवे,भास्कर गवळी,रतन चौधरी,आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष उत्तम वाघमारे, पांडुरंग पवार,प्रभाकर महाले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी मंजुळा गावित म्हणाल्या की, आदिवासी भागातील मुले मेहनती, जिद्दी, काटक,चपळाई हे गुण असल्याने ते गेलो इंडिया सारख्या स्पर्धेत नावलौकीक मिळवत आहेत. देवलदरी या गुजरात राज्याच्या सीमेजवळ वसलेल्या गावातील शाळेने राष्ट्रीय पातळीवर खोखो स्पर्धेत एक इतिहास रचला आहे. या जिल्हा परिषद शाळेचे सात विद्यार्थी आज राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी होत नावलौकीक मिळवत आहेत. हि बाब निश्चितच गौरवशाली आहे.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ.गावित म्हणाल्या की,आपल्याकडे बुद्धि व कौशल्य आहे. त्यामुळेच माणूस घडत असतो. जीवनात नैराश्य येईल असे वर्तन कदापिही करू नका. आयुष्यात न्यूनगंड आणून खच्चीकरण करुन घेऊ नका. शिक्षकी पेशा हा समाज घडवितो. विद्या दान करतो. एक विद्यार्थी घडला तर अख्खे कुटुंब घडत असते. माणूस हा चुकीचा पुतळा आहे ती झालेली चूक दुरुस्त केली पाहिजे. चुक झाली म्हणून सार्वजनिक ठिकाणी कोणाचाही अपमान करू नका. भान ठेवून जबाबदारी ओळखणारा जीवनात यशस्वी ठरतो. जीवनात परिस्थितीच माणसाला शिकवते असे नमूद करीत साठ वर्षापुर्वी वडिलांना हप्त्यातून मिळणा-या केवळ एक रुपयाच्या मजुरीवर कुटुंब चालवत आमचेही शिक्षण पूर्ण केले.घरचीच शिदोरी चटणी भाकरी खात शिक्षण घेतले होते. ते दिवस आज उरले नाहीत. अशा आठवणींना त्यांनी उजाळा दिला.