राजपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यभरात अनेक ठिकाणी उमटले. ‘राजस्थानी आणि गुजराती लोक मुंबई मधून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही’ या राज्यपालांच्या वक्तव्यानंतर (Controversial statement of Governor Bhagat Singh Koshyari) मराठी माणूस दुखावल्याच्या प्रतिक्रिया समोर आल्या. त्यासोबतच राजकीय वर्तुळातून एका जबाबदार आणि राज्याच्या प्रथम नागरिकाने असे वक्तव्य करणे टाळावे अशा देखील प्रतिक्रिया समोर आल्या. दरम्यान याबाबत स्पष्टीकरण देत ‘माझ्या हातून मराठी माणसाचा अपमान होणार नाही, मी विधान केलं त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा हेतू नव्हता, असं राज्यपालांनी म्हटलंय.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून राज्यभरातील जनतेसह अनेक नेत्यांच्या तीव्र अश्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी राज्यपालांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. या उठलेल्या तीव्र वादळानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी एका निवेदनातून आपली भूमिका मांडली आहे. “छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान आहे. मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो.अस त्यांनी स्पष्ट केलं.
मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही, किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे. असे राज्यपाल कोश्यारी यांनी यात नमूद केले.