त्र्यंबककरांनो, दहा दिवस पिण्याचे पाणी उकळून प्या!

त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी

त्र्यंबकच्या नागरिकांना पुढील दहा दिवस पाणी उकळून पिण्याचे त्र्यंबक नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. येथील जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीचे काम चालणार असल्याने हे आवाहन करण्यात आले आहे.

त्र्यंबक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आंबोली धरणावरून येणा-या पाण्यासाठी कार्यरत असणा-या निलपर्वत पायथा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर मीडिया बदलण्याचे काम नगरपरिषदेमार्फत गुरुवार (दि.०६) पासून हाती घेण्यात येणार आहे. हे काम साधारण १० दिवस चालणार आहे. या कामामुळे जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी गाळण्याचे काम तात्पुरते थांबणार आहे. नगरपरिषदेमार्फत पाणी फक्त निर्जंतुक करून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

त्यामुळे शहरातील चौकीमाथा, इंदिरा नगर , मेन रोड, तेली गल्ली, कडलग गल्ली, गाडगेबाबा लेन, डोबी गल्ली, कोथेगल्ली, पाटीलगल्ली, टॅक्सी स्टॅण्ड परिसर, गायधनी गल्ली, गोकुळ दासलेन, पोष्ट गल्ली, डॉ.आंबेडकर नगर, शिक्षक कॉलनी, डॉक्टर कॉलनी, ध्रुव पॅलेस परिसर , कुशावर्त तीर्थाच्या मागील परिसर व कामगार चाळ या भागातील नागरिकांनी पाणी उकळून अथवा गाळूनच प्यायचे आहे.

या जलशुद्धीकरण केंद्रावरून पुरवठा होणारे पाणी शुक्रवार (दि.०७) पासून हे काम पूर्ण होईपर्यंत गाळून व उकळूनच घेऊन पिण्याकरिता वापरून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.