खबरदार! नायलॉन मांजा वापराल तर.! आता थेट तडीपारी

नाशिक | प्रतिनिधी

पक्षी, प्राण्यांसह मनुष्याच्या जीवाला धोकादायक ठरणाऱ्या नायलॉन माजांच्या विक्रीला बंदी आहे. ही बंदी झुगारून नायलॉन मांजाची निर्मिती, विक्री, साठवणूक किंवा वापर करताना आढळल्यास थेट तडीपारीची कारवाई करण्यात येईल असा इशाराच नाशिक पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी दिला आहे.

येत्या संक्रात सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी दि. ०४ जानेवारी ते ३० जानेवारी या कालावधीत नायलॉन मांजाची निर्मिती, विक्री, पूरवठा, साठवणूक आणि वापर करण्यावर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यातच जर या नियमांचे कोणी उल्लंघन केले तर संबंधितांना थेट ०४ महिने ते ०१ वर्षांपर्यंत शिक्षा देखील होऊ शकते. तसेच मांजामुळे कुणाच्या जीवितास धोका निर्माण झाला तर त्या दोषींवर थेट तडीपारीची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देखील नाशिक पोलिसांनी दिला आहे.

मकरसंक्रांतीच्या आधीच काही दिवस नाशिकमध्ये पतंगबाजी सुरू होते. पतंगबाजी करताना काटाकाटीच्या स्पर्धेत नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे पतंगप्रेमींबरोबरच रस्‍त्यावर चालतानाही जीव मुठीत घेऊन फिरावे लागते. मांजामुळे या कालावधीत अनेक पक्षी, प्राणी जखमी होतात, तर काही मृत्यूमुखी पडतात.

या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. ते म्हणाले जर नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यामुळे कोणाच्या जिवितास हानी झाली तर संबंधितांवर पोलिसांकडून थेट तडीपारीची कारवाई केली जाणार आहे.