होळीच्या दिवशीच नाशकात खून; अवघ्या दोन तासांत ३ संशयित ताब्यात

नाशिक : काल सायंकाळच्या सुमारास नाशिक शहरातील पंचवटी परिसरात एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली होती. नाशिकच्या पेठरोड परिसरातील शनि मंदिर जवळील रहिवासी किरण गुंजाळ (वय २७) याची पंचवटीतील दिंडोरी रोडवरील अभिषेक स्वीट्ससमोर सायंकाळी भर रस्त्यात धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

या घटनेतील संशयित आरोपी आणि मयत व्यक्ती हे पंचवटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हमालीचे काम करत होते. संशयित आरोपी आणि मयत व्यक्ती यांच्यात पूर्वी देखील आपापसांत किरकोळ वाद झाला होता. काल संध्याकाळी देखील पुन्हा त्यांच्यात किरकोळ वाद होऊन, या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. त्यानंतर तीन संशयित आरोपींनी किरण गुंजाळ याचा चाकूने भोसकून आणि गळ्यावर वार करून खून केला.

या घटनेतील मयत तरुण किरण गुंजाळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर एक गंभीर तर तीन-चार किरकोळ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच या हल्ल्यामागे काही वेगळे कारण होते का, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली.

या घटनेमुळे नाशिक शहर ऐन सणासुदीच्या दिवशी हादरले. काळ सायंकाळच्या सुमारास पंचवटी परिसरात एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली. यानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर नाशिकच्या पेठरोड परिसरातील शनि मंदिर जवळील रहिवासी किरण गुंजाळ (वय २७) याची पंचवटीतील दिंडोरी रोडवरील अभिषेक स्वीट्ससमोर सायंकाळी भर रस्त्यात धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. मयत तरुण हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती देखील आज पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान ३ ते ४ जणांनी गुंजाळ याच्यावर हल्ला केला होता. या हल्लेखोरांच्या मागावर पोलीसांनी जवळपास 5 ते 7 किलोमीटर पाठलाग केला. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही तपासणीचे काम सुरू केले. पंचवटी परिसरात सायंकाळी भर चौकात झालेल्या खुनाची पोलिसांनी गंभीर दाखल घेतली. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत विशेष लक्ष दिले असून, गुन्हेगारांच्या शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथकांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर पंचवटी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच या हल्ल्यामागे काही वेगळे कारण होते का, याचा तपास सुरू असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.