जवळपास २६०० हेक्टर पिकं पाण्याखाली; तोंडाशी आलेला घास हिरावला

नाशिक : नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. ६) पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आधीच संकटात सापडलेला शेतकरी अवकाळी पावसाने दुहेरी संकटात सापडला. १३५ गावांमध्ये सुमारे २४३ शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर पाणी फिरलं. असा अंदाज जिल्हा प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. २ हजार ६८४ हेक्टर वरील कांदा, गहू, द्राक्ष, डाळिंबबाग पालेभाज्या फळभाज्या शेतपिक नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे डोळे पाणावले आहे.

राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली होती. अशात नाशिक जिल्ह्यात रविवारपासून (दि.५) वातावरण निर्मिती झाली. सोमवारी (दि.६) पहाटे चार वाजेच्या सुमारास ढगांच्या गडगडाटा सह पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. या पावसाचा रब्बी पिकांना फटका बसला आहे. काढणीस आलेला गहू, हरभरा, मसूर अशी रब्बी पिके संकटात सापडली आहेत. काही शेतकऱ्यांनी गहू, हरभरा कापून शेतामध्ये ठेवला होता. तर काही शेतकऱ्यांचा गहू पूर्ण वाळून हा अजून देखील शेतामध्ये उभा होता. या सर्व कष्टावर एका रात्रीतून पाणी फिरले आहे.

कांदा पिकांवर येणारे मावा करपा रोगाच्या संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागेल व नुकतेच आलेले आंब्याचे मोहर देखील करपण्याची शक्यता आहे. एकीकडे भाजीपाल्याचे भाव कोसळले अन् एकीकडे अवकाळी पावसाचा फटका. जनावरांना जमा करून ठेवलेला चारा खुराक पूर्ण ओला झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काल पाहते तसेच आज सकाळी देखील काही प्रमाणात पावसाच्या सारी कोसळल्या. काळ दिवसभर पाऊस थोडी थोडी विश्रांती घेत कोसळत होता. त्यामुळे एकीकडे शेतीमालाला मातीमोल भाव मिळत नसताना अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकरी अधिक चिंतेत पडला आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला पट्ट्यात निफाड, लासलगावसह अन्य काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी हजेरीमुळे कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्षं यांसह भाजीपाल्याला मोठा फटका बसला आहे.

जिल्ह्यातील द्राक्षबागा, डाळिंब बागांसह कांदा पाण्यात गेला आहे. जिल्हा प्रशासनाने प्राथमिक अंदाज वर्तवला आहे, त्यानुसार २ हजार ६८४ हेक्टर वरील शेताचे नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे. तर यापेक्षाही मोठा आकडा अंतिम अहवालात समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याभरात हा अहवाल समोर येणार आहे.