Home » नाबार्डचा ६ लाख १३ हजार कोटीचा पतपुरवठा आराखडा

नाबार्डचा ६ लाख १३ हजार कोटीचा पतपुरवठा आराखडा

by नाशिक तक
0 comment

मुंबई । प्रतिनिधी
नाबार्डने महाराष्ट्रासाठी सन २०२२-२३ या वित्तीय वर्षासाठी ६ लाख १३ हजार ५०३ कोटी रुपयांचा संभाव्य पतपुरवठा आराखडा (कर्ज योजना) निश्चित केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नाबार्डचा स्टेट फोकस पेपर प्रकाशित करण्यात आला. यावेळी बोलताना ठाकरे यांनी नाबार्डने फोकस पेपर तीन ते पाच वर्षांसाठी तयार करावा, अशी सूचना केली. नाबार्डने राज्य फोकस पेपर तीन ते पाच वर्षांसाठी तयार केला तर पहिल्या वर्षी अंदाजपत्रक आणि निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन उर्वरित दोन वर्षात ही कामे पूर्णत्वाला जाऊ शकतील, असे ठाकरे म्हणाले.

नाबार्डचा पतपुरवठा आराखडा सध्याच्या ऋण योजनेच्या ३ टक्के अधिक आहे. या योजनेत कृषी क्षेत्रासाठी १ लाख ४३ हजार ०१९ कोटी रुपये (एकूण योजनेच्या २३.३ टक्के) ठेवण्यात आले आहेत. लघु, मध्यम आणि सुक्ष्म उद्योगांसाठी ३ लाख, ४८ हजार, ३७२ कोटी रुपयांचा निधी (एकूण योजनेच्या ५६.८ टक्के) ठेवण्यात आला आहे. तर इतर प्राधान्यक्रम क्षेत्रासाठी (शिक्षण, गृहनिर्माण, अक्षय उर्जा, बचतगटांचा वित्तपुरवठा इ.) १ लाख २२ हजार ११२ कोटी रुपयांचा निधी ( एकूण योजनेच्या १९.९ टक्के) निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, विकासासाठी भांडवल, तंत्रज्ञान, कच्चा माल आणि मानव संसाधन या चार गोष्टी महत्वाच्या असतात. आपल्याकडे तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ आणि कच्च्या मालाची कमी नाही. परंतू भांडवल हा त्यातला सर्वात महत्वाचा विषय असतो. नाबार्डने राज्याच्या विकास संधी आणि गरजा लक्षात घेऊन हा फोकस पेपर तयार केला असावा.

नाबार्डसमवेत राज्य शासनाच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या किमान तीन महिन्यांनी बैठका व्हाव्यात. जेणेकरून फोकस पेपरमध्ये जी उद्दिष्ट्ये दिली आहेत त्याची पूर्तता होते किंवा नाही याची स्पष्टता होईल. तसेच अंमलबजावणीतील उणिवा लक्षात येऊन उद्दिष्टपूर्तीला गती देता येईल, असेही ठाकरे यांनी सांगितले.

राज्य शासन आणि नाबार्डचा राज्य विकासाचा आणि राज्य हिताचा उद्देश समसमान असल्याने आपण हातात हात घालून काम करू या, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!