जपानी पर्यटक हरिहरच्या प्रेमात! केला शिवरायांचा जयघोष!

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्याला एतिहासीक वारसा लाभलेला असून डोंगर, टेकड्यांवर अनेक किल्ले आहेत. यात प्रामुख्याने हरिहर किल्याचे विशेष आकर्षण आहे. त्यामुळे नुकत्याच काही विदेशी पर्यटकांनी या किल्ल्याला भेट दिली असून किल्ला पाहून ते प्रेमात पडले आहेत.

महाराष्ट्रातील गडकिल्ले नेहमीच पर्यटकांचे आकर्षण ठरलेले आहे. यामुळे अनेक विदेशी ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास करण्यासाठी तसेच भटकंतीसाठी येत असतात. मुंबईला कामानिमित्त आलेल्या काही जपानी पर्यटकांनी नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या हरिहर किल्ल्याला नुकतीच भेट दिली. हा अभेद्य तितकाच सुंहदार किल्ला पाहून हे जपानी पर्यटक किल्ल्याच्या प्रेमात पडले.

मुंबईत जपानी कामगारांच्या दृष्टिकोनातून मेट्रोचे अवाढव्य काम सुरु असून या जपानी नागरिकांची मल्हारी आणि रिट्राइट या कंपनीशी ओळख झाली. त्यांनी किल्ल्यावर ट्रेकिंग करण्याचे बोलून दाखवले. त्यावेळी मल्हारी अँड रिट्राइट या कंपनीने नाशिक येथील ट्रेकर निलेश काटे यांच्याशी संपर्क केला. काटे यांनी त्वरित नियोजन कळवून हरिहर किल्ल्याविषयी त्यांना माहिती दिली. हरिहर किल्ल्याचा इतिहास हे जपानी नागरिक किल्ल्याच्या प्रेमात पडले आणि हरिहर किल्ल्याला भेट देण्याचे ठरले.

किल्ला भेटीसाठी १९ फेब्रुवारी हा दिवस ठरला. हे जपानी नागरिक (दि. १८) त्र्यंबकेश्वर येथे मुक्कामी होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण सायकलने हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी सकाळी पाच वाजता पोहचले. यावेळी निलेश यांच्यासह योगेश पावले, सागर काकड, धनंजय वडणेरकर आणि सागर रोहम आदींसह जपानी नागरिकांनी हरिहर सर करण्यास सुरवात केली. यांनतर साधारण अडीच तासांनंतर ते किल्ल्याच्या माथ्यावर पोहचले.

यावेळी जपानी नागरिकांनी एकच जल्लोष केला. याठिकाणी शिवाजी महाराजांना वंदन करीत शिवजयंती देखील साजरी करण्यात आली. या नागरिकांनी हरिहरचे सौंदर्य पाहून ते प्रेमात पडल्याची भावना ट्रेकर निलेश काटे यांनी व्यक्त केली. यानंतरही नाशिक जिल्ह्यातील गडकिल्ले भटकंती करायला आवडेल अशी इच्छा जपानी नागरिकांनी बोलून दाखवली.