दुर्दैवी! दुचाकी दुभाजकावर आदळून दोघा मित्रांचा मृत्यू


नाशिक | प्रतिनिधी

महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर दोघे मित्र एकाच दुचाकीने फेरफटका मारण्यासाठी गंगापूर धरणाच्या दिशेने निघाले असताना दुपारी चार वाजेच्या सुमारास दुचाकीवरील ताबा सुटल्याने गो-वर्धन गावाजवळ दुचाकी दुभाजकावर जाऊन आदळली. या दुर्घटनेत दोघांचा डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले.

यशराज अनिल पगार (मखमलाबाद रोड), संकेत विजय ठाकरे (चेतना नगर) अशी मयत झालेल्या तरूणांची नावे आहेत. हे दोघे कॉलेज रोडवर नेहमीप्रमाणे महाविद्यालयात भेटले. तेथून दुपारी यशराजच्या यामाहा दुचाकीने (एमएच १५ एफडब्ल्यू ८७३०) दोघेही फेरफटका मारण्यासाठी गंगापूर धरणाच्या दिशेने निघाले.

दरम्यान गंगापूर गावातून बाहेर पडल्यानंतर गोवर्धन शिवारात एका महाविद्यालय पुढे असलेल्या धोकादायक वळणावर दुचाकी चालकाचा ताबा सुटला. यावेळी भरधाव दुचाकी दुभाजकावर व रस्त्यालगत असलेल्या एका मोकळ्या भूखंडाच्या संरक्षक भिंतीवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही युवकांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीआणि ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.

अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली तसेच तालुका पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले.

पावणे पाच वाजेच्या सुमारास दोघांना रुग्णवाहिका मधून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.