हिरवी मिरची झाली अधिक ‘तिखट’, कोथिंबीरही भाव खाऊ लागली!

नाशिक | प्रतिनिधी
पेट्रोल डिझेल दराप्रमाणे आता भाजीपाला देखील महागला असून सर्वसामान्यांचा बजेट कोलमडले आहे.

गेल्या काही दिवसांपासून इंधनासह भाजीपाला भावात कमालीची वाढ झाली आहे. भाजीपाला आता मागे राहिला नसून भाजीपाल्याचे दरही चांगलेच वधारले आहे. आज बाजारात ४०-५० रुपयांच्या आत एकही भाजी मिळत नाही अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे, हिरवी मिरचीचे भाव सध्या २०० रुपये किलोवर पोहचले असून मिरची चांगलीच तिखट झाली आहे. तर हिरव्या भाज्या आता संपत आल्याने त्यांचे दर वधारले आहे. किराणा माल वधारला असतानाच स्वयंपाक घराचे बजेट बिघडले असून, त्यात आता भाजीपाल्याचे दर ऐकताच घाम फुटत आहे.

आजघडीला प्रत्येकच वस्तूचे दर वधारले असून सर्वसामान्यांना आता बाजारात जाणे म्हणताच धडकी भरू लागते. रशिया व युक्रेनमधील युद्धाचे पडसाद उमटू लागले असून खाद्यतेलाचे भाव वधारल्यानंतर आता किराणामालही वधारत चालला आहे. त्याचबरोबर भाजी पाल्यानेही आपला रंग दाखवायला सुरवात केली आहे

दरम्यान उन्हाळा सुरू झाल्याने शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने त्याचा परिणाम बाजार समितीत विक्रीला येणार्‍या पालेभाज्यांवर झाला आहे. पालेभाज्या काही प्रमाणात कमी झाल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. त्यामुळे गृहिणींचे स्वयंपाकाचे बजेट बिघडत आहे. मंगळवारी सायंकाळी बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या कोथिंबिरीच्या प्रति जोडीला ५० रुपये तर मेथी जुडीला ३० रुपये प्रति जोडीदाराने विक्री झाली. त्याचबरोबर हिरव्या मिरच्या देखील भाव गगनाला भिडला आहे. ५० रुपये पावशेर ने हिरवी मिरची विकली जात आहे.

आगामी काळात उन्हाचा कडाका वाढला तर शेतातील पिकांना पाणी कमी पडेल. त्यामुळे बाजारभाव आणखी तेजी येण्याची शक्यता असल्याचे बाजार समितीतील व्यापारी वर्गाने सांगितले आहे. अशात मात्र सर्वसामान्यांनी काय खावे असा प्रश्न पडतो. शासनाने महागाई नियंत्रणात आणून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा ही एकच मागणी जनता करीत आहे.