नाशिक सिटीबस सेवेच्या विस्ताराला ब्रेक लागणार

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीकडून सुरू करण्यात आलेल्या शहर बससेवेच्या विस्ताराला सीएनजीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे ब्रेक लागण्याची शक्यता आहे. अपुरा पुरवठ्यामुळे ग्रामीण भागातील सेवा बारगळल्याची बाब समोर आली आहे.

दरम्यान गेल्या पाच महिन्यांपासून महापालिकेकडून शहर बससेवा सुरू करण्यात आली. नाशिक महापालिकेने मोजक्या बसेससह सेवा देण्यास सुरवात केली. मात्र अल्पावधीतच सिटी लिंक बस सेवेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे नाशिक मनपाने आणखी बस रस्त्यावर उतरवल्या. यामध्ये सातत्याने वाढ होत गेली. त्यात टप्प्याटप्प्याने बसची संख्या, नवे मार्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. महत्वाचे म्हणजे काही दिवसांतच नाशिक शहराबाहेर या बसेस धावू लागल्या.

आजमितीस नाशिक शहरासह मनपा हद्दीत सध्या १४८ बस धावत आहेत. १४८ बसपैकी ९८ बस सीएनजी, तर ५० बस डिझेल इंधनावर धावत आहे. त्यातच धार्मिक स्थळे खुली करण्यात आली आहे, तर शैक्षणिक संस्था सुरू झाल्याने विद्यार्थी संख्या बससेवेला वाढत आहे. यामुळे विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र अपुऱ्या सीएनजी अभावी बस सेवेचा विस्तार होण्याची शक्यता कमी आहे.

नाशिक शहरामध्ये सीएनजीचे अवघे ३ पंप आहे. पाथर्डी फाटा, आडगाव व जेल रोड येथे तीन पंप असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. बसमध्ये सीएनजी इंधन भरण्यासाठी रात्री बारानंतर मुदत देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरदेखील इंधन मिळत नाही. शहराबाहेर बस चालवण्यासाठी लागणारा ज्यादा सीएनजी सध्या उपलब्ध नाही आहे. तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेल दरवाढीने शंभरी पार केली आहे. यामुळे वाहतूक करताना दोन्ही प्रकारचे इंधन परवडत नसल्याने स्वस्तातील सीएनजी इंधन वापरण्याकडे ग्राहकांचा कल आहे.

शहरात उपलब्ध असलेल्या तीन पंपांवर सीएनजी इंधन भरण्यासाठी चार ते पाच तास रांगा लावाव्या लागत आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सीएनजी पंप वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ग्रामीण भागातील सेवेत अडसर शहर बससेवेचा विस्तार करताना भगूर, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, सायखेडा, ओझर आदी भागापर्यंत महापालिकेने बससेवेचा विस्तार केला आहे. परंतु, आता सीएनजी इंधन उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागात सेवा पुरविण्यात अडचणी निर्माण होत आहे.

महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून विल्होळी येथे सीएनजी प्लांट उभारण्याचे काम सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात गौण खनिज विभागाची परवानगी न घेता सुरुंग लावून दगड फोडण्यात आल्याने महापालिकेने या कामावर बंदी आणली होती. मात्र, आता काम सुरळीत सुरू झाले आहे. डिसेंबरअखेरपर्यंत सीएनजी प्लान्ट सुरू होईल. परिणामी शहरा बाहेरच्या नागरिकांना सिटीबससाठी काही काळ आता वाट बघावी लागणार आहे.