नाशिक | गोकुळ पवार
यंत्रभूमी, तंत्रभूमी म्हणून ओळख असलेले नाशिक शहर आता गुन्हेगारांची भूमी म्हणून ओळख निर्माण होऊ लागली आहे. नाशिक शहर सुरक्षित शहर मानले जाते, मात्र या सुरक्षिततेला वाढत्या गुन्ह्यांच्या घटनांनी ग्रहण लागले आहे.
आजही नाशिक शहराला गुलशनाबाद म्हणून ओळख आहे. गुलशनाबाद म्हणजे फुलांचे शहर. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरात होणाऱ्या वाढत्या गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. त्यामुळे नाशकात पोलीस राज अस्तित्वात आहे की नाही, अशा प्रश्न निर्माण होतो. शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून, गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. शहरात खून, चाकू हल्ले, घरफोड्या, चैन स्नॅचिंग व सराईत गुन्हेगारांनी मांडलेल्या उच्छादामुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत आहेत.
गेल्या नोव्हेंबर महिन्यात तब्बल लहान मोठ्या २६७ गुन्ह्यांची झाली नोंद झाली असून यात ०५ खून १४ जबरी लूटमार तर ७५ वाहने चोरीला गेली आहेत. म्हणजे पावणे तीन तासात नाशिक शहरात एक गुन्हा घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून शहरातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे.
गेल्या महिन्यात आठ दिवसांत तीन खून, हाणामाऱ्या, हाफ मर्डर अशा घटनांनी शहर हादरत आहे. त्यामुळे शहरातील नागरीकांची सुरक्षितता वाऱ्यावर आहे. चॉपर हल्ले, चैन स्नॅचिंग या घटना दिवसा ढवळ्या होत आहेत. महिनाभरापूर्वी सातपुर, पंचवटी, म्हसरूळ आदी ठिकाणी खुनाचे प्रकार घडले होते. त्यांनतर दोन दिवसांपूर्वी टोळक्याने तरुणावर चॉपर हल्ला, आडगाव येथील बड्डे पार्टीतील मारहाण प्रकरण यामुळे नाशिक शहराला गुन्हेगारीची ओळख निर्माण होत आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पोलीस ॲक्शन मोडमध्ये दिसत असले तरी याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांचा वचक कमी झाला झाल्याचे पाहायला मिळते आहे.
दरम्यान या सर्व घटना उघडकीस आणण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान असून गुन्हेगारांना चाप कधी बसणार असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. यातील काही घटनांतील गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांना तंबी दिली असली तरी वाढती गुन्हेगारी पोलीस प्रशासनापुढे डोकेदुखी ठरत आहे.