राज्यात दिवसभरात ओमायक्रोनचे ‘इतके’ रुग्ण

नाशिक | प्रतिनिधी

राज्यात हळूहळू ओमायक्रोनने पाय पसरायला सुरवात केली आहे. आज राज्यात ०८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

दरम्यान कोरोनाचा नवा ओमायक्रोन व्हेरिएंटने राज्यात शिरकाव केल्यापासून चिंता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार खबरदारीच्या उपाययोजना करत आहे.

राज्यात आज दिवसभरात ०८ जणांचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आला असून ०८ रुग्णांपैकी ०७ जण मुंबई तर एक रुग्ण वसई-विरारमधला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या रुग्णांमध्ये ०३ महिला आणि ०५ पुरुषांचा समावेश आहे.

राज्यात ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या वाढत चालली असून आकडा एकूण २८ वर पोहोचला आहे. नव्या आकडेवारी नुसार ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांपैकी ०९ जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली होती.

आतापर्यंत राज्यात ओमायक्रॉनचे मुंबईत ०७, पिंपरी-चिंचवडमध्ये १०, पुणे महापालिका हद्दीत ०२, कल्याण-डोंबिवलीत ०१, वसई-विरारमध्ये ०१, नागपूर ०१ आणि लातूरमध्ये ०१ रुग्ण आढळून आला आहे.