नाशिक शहर सोमवारपासून कोरोना निर्बंधातून मुक्त होणार?

नाशिक । प्रतिनिधी

जसजसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे, त्यानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात इवेंट या मागणीसाठी महापालिकेने सरकारला पत्र लिहल्याचे समजते आहे.

गेल्या दोन वर्षांपासून देशासह राज्यात थैमान घातलेल्या कोरोनाने अनेकांना सळो कि पळो केले होते. मात्र आता परिस्थिती निवळली असून लसीकरणावर भर दिला जात आहे. यामुळे अनेक जिल्ह्यात निर्बंध देखिलं शिथिल करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी तर कोरोनामुक्त शहरे पाहायला मिळत आहेत.

त्यामुळे नाशिक जिल्ह्यातही आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून निर्बंध शिथिल करण्याची मागणीचे पत्र महापालिकेने सरकारला पाठवले आहे. दरम्यान राज्य सरकार यावर सकारात्मक असल्याचे समजते. येत्या सोमवारपासून नाशिक महापालिका हद्दीत तरी निर्बंध उठू शकतात, अशी चर्चा आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले होते. दुसऱ्या लाटेत तर हजारो जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. आपल्या जीवलगांना वाचवण्यासाठी ऑक्सिजन हवा म्हणून कित्येक कुटुंब रस्त्यावर रांगेत उभे राहिले. मात्र, सध्या कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर गेली आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता नाही. मृत्यू थांबले आहेत, पण जिल्ह्यातील कोरोना निर्बंध कायम आहेत. त्यामुळे विवाह सोहळ्यापासून ते राजकीय कार्यक्रमही अवघ्या पन्नास टक्के उपस्थितीत पार पाडावे लागत आहेत. त्यामुळे हे निर्बंध तातडीने उठवावेत, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.