नाशिक झेडपीच्या पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाचा अखेरचा दिवस गाजला!

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाचा अखेरचा दिवस गाजला तो काही विशेष घटनांनी. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जिल्हा परिषद कामकाजाचा घेतलेला आढावा, पदाधिकारी, अधिकारी यासोबत केलेली चर्चा, काही महत्वाच्या कामांचा केलेला शुभारंभ यामध्ये जिल्हा परिषदेचा नवीन लोगो, नवी वेबसाईट यामुळे जिल्हा परिषदेला एक प्रकारे झळाळी आल्याचे दिसून आले.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विकास,रोजगार यावर कोरोनाकाळातही ताकदीनं काम केलेल्या, प्रशासनाचा विभागीय आयुक्तांनी विशेष गौरव केला. ग्रामविकास समन्वय पातळीवर सर्वोत्कृष्ट काम केलेल्या नाशिक जिल्हा परिषदेचा नुकताच शासनानं गौरव केला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या संकल्पनेतुन तयार झालेला नवा लोगो, ग्रामीण भागात उल्लेखनीय काम होत असल्याची माहिती देणारी चित्रफीत आणि जिल्हा परिषदेत कामासाठी संपर्क करणाऱ्या सर्व स्तरातील नागरिकांसाठी उभारण्यात आलेलं सक्षम डिजिटल व्यासपीठ,अर्थात नूतन वेबसाईटचा शुभारंभ विभागीय आयुक्तांनी केला.

जिल्हा परिषद बाळासाहेब क्षीरसागर यांच्या कार्यकाळातील हा अखेरचा दिवस. विकासाभिमुख भूमिका घेण्यात, प्रशासन करीत असलेल्या धडक अंमलबजावणीचं विशेष कौतुक राधाकृष्ण गमे यांनी केले. कोरोना काळात ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडून पडू नये, याकरीता लीना बनसोड यांनी महिला बचत गटांना एकत्र करीत, घरोघरी मास्क बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याला बाजारपेठही उपलब्ध करुन दिली. राज्यातील हा पहिलाच प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. ग्रामीण भागातील प्रत्येकाच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याने, गेल्या अनेक वर्षांपासून जेमतेम असलेला रोहयो आलेखात लक्षणीय बदल झाला.

जिल्हा परिषद सदस्य आणी प्रशासन यांनी एकत्र येऊन काम केलं तर कायापालट कसा होऊ शकतो, याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून राज्य सरकारनं, नाशिक जिल्हा परिषदेचा विशेष गौरव केला आहे. या नवीन सुलभ वेबसाईटच्या माध्यमातून आता जिल्ह्यातील प्रत्येक सर्वसामान्यांना येणाऱ्या अडचणी त्वरीत दूर होण्याची खात्री प्रशासन देत आहे. येत्या ०२ दिवसात विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड या प्रशासक म्हणून चार्ज घेणार असल्याने उत्सुकता आहे.