शेत जमिनीची मोजणीसाठी मागितली ५० हजारांची लाच

नाशिक | प्रतिनिधी
बिनशेती मोजणी प्रकार व नकाशा मिळवण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्विकारतांना अधिकाऱ्यास धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर नांदगाव तालुक्यातील अधिकारी वर्गाचे धाबे दणाणले आहेत.

विलास पांडुरंग दाणी असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. दाणी हे जुन्या तहसीलदार कार्यालयातील भूमिअभिलेख उपअधिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मनमाड शिवारातील शेत जमिनीचे बिनशेती मोजणी करून व त्याचा नकाशा मिळावा यासाठी मागील तीन महिन्यापूर्वी प्रकरण जमा केले होते.

या प्रकरणी तक्रारदार यांनी वारंवार भूमी अभिलेख येथे चकरा मारून प्रकरणाची चौकशी करत विचारणा करत होते. मात्र या बिनशेती मोजणी व नकाशा मिळविण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक विलास पांडुरंग दाणी यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली होती.

या मागणी नंतर तक्रारदार यांनी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात संपर्क करत भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्याने लाच मागीतल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जुन्या तहसील कार्यालयातील भूमी अभिलेख कार्यालयात सापळा रचून तक्रारदाराकरवी चाळीस हजार रुपयांची लाच उपअधीक्षक विलास पांडुरंग दाणी यांना देतांना या पथकाने रंगेहाथ पकडले.

या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक, धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने कारवाई केली आहे. लाचखोर अधिकारी दाणी यांची कार्यपद्धती व भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार यामुळे चव्हाट्यावर आला आहे.