नाशिकमधील मनसैनिकांना ‘या’ तारखेपर्यंत शहरात राहण्यास मज्जाव


नाशिक । प्रतिनिधी

मशिदींवरील भोंगे न उतरवल्यास हनुमान चालिसा (Hanuman chalisa) वाजवण्याचे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thakaray) यांनी केल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेस बाधा येण्याची शक्यता शहर पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे शहर पोलिसांनी मंगळवारी (दि.३) मनसेच्या (MNS) काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ४ ते ८ मे पर्यंत शहरात वास्तव्य न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर इतरांना सीआरपीसी १४९ नुसार नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

दरम्यान, शहरात शांतता राहावी यासाठी पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. रमजान ईदनिमित्त ( Ramjan Eid) जो बंदोबस्त तैनात होता तोच बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. पोलिस ठाणे (Nashik Police Thane)निहाय बंदोबस्त तैनात असून वरिष्ठ पोलिसांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. मनसे कार्यालयाबाहेर(Nashik MNS office) पोलिसांचा २४ तास बंदोबस्त तैनात असून ५०० होमगार्ड, एसआरपीएफच्या (SRPF) दोन तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात आहे.

मशिदींवरील भोंगे न उतरवल्यास भोंगे लावून हनुमान चालिसा वाजवा असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी सरकारला ३ मेपर्यंत भोंगे काढण्यास मुदत दिली होती. त्यानंतर हनुमान चालिसा लावण्यास मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले. यामुळे शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

खबरदारी म्हणून पोलिसांनी पोलिस ठाणेनिहाय मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (२) नुसार नोटीस (Notice) बजावण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार संबंधित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ४ ते ८ मेपर्यंत शहरात वास्तव्य करण्यास मनाई केली आहे. या आदेशाचा भंग केल्यास कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.