नाशिकच्या प्रत्येक प्रभागात ‘स्मार्ट स्कुल, ‘बजेट’मध्ये नाशिककरांना काय?

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक मनपाचे यंदाच्या वर्षातील अंदाजपत्रक सादर करण्यात आले असून मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी मनपा स्थायी समिती सभापती गणेश गीते यांना सादर केले आहे. यामध्ये नाशिककरांना दिलासा देणारी बाब म्हणजे यंदाही कुठल्याही करामध्ये दरवाढ नसल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

नाशिक (Nashik) महानगरपालिकेचे (Municipal Corporation) आयुक्त कैलास जाधव यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षासाठी रु. ५३.५२ कोटी आरंभीच्या शिल्लकेसह, रु. २२२७.०५ कोटी जमेचे व रु. २२१९.०२ कोटी खर्चाचे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. तसेच सन २०२२-२०२३ च्या मूळ अंदाजपत्रकानुसार, अखेरची शिल्लक रक्कम रु. ८.०३ कोटी दर्शविण्यात आलेली आहे. सन २०२१-२०२२ सुधारीत व सन २०२२-२३ चे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले.

दरम्यान या सादर केलेल्या अंदाजपत्रकात कुठल्याही करामध्ये दरवाढ नाही, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी महसूली ५० कोटी आणि भांडवली ४० कोटींची तरतुद करण्यात आली आहे. तसेच कोविडसाठी ३० कोटी, पर्यावरण विषयांसाठी २५ कोटी, नाशिकमधील प्रत्येक प्रभागात स्मार्ट स्कुल उभारणार १५ कोटींची तरतूद, बिटको कॉलेजमध्ये मेडिकल चा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी १५ कोटी, आयटी हब साठी १० कोटी, निवडणुकीसाठी चालू वर्षी १० कोटी, पुढील वर्षी १० कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

त्याचबरोबर महापुरुषांचा स्मारके उभारणीसाठी नाशिक महापालिकेने अंदाजपत्रकात विशेष तरतूद केली आहे. यामध्ये मुंबई नाका येथे महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा, सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात राजमाता जिजाऊ स्मारक उभारणार, बिडी भालेकर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा बसविणार, पंचवटी येथे महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यासाठी तरतूद केली आहे.

तसेच शहरातील रस्ते, पदपथ, उड्डाणपूल, जलवाहिन्या, मलनि:स्सारण वाहिन्या, परिवहन, विद्युतीकरण, उद्यान विकास, शिक्षण, वैद्यकिय सेवा, घनकचरा व्यवस्थापन आदी नागरी सुविधांची पूर्तता करतांना समतोल विकासाचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच ई-गव्हर्नन्सचा प्रभावी वापर करुन, सुलभ, पारदर्शक व गतिमान प्रशासकीय कामकाज करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच स्मार्ट स्कूल, पर्यावरण, नमामी गोदा, वैद्यकीय सेवा, आयटी हब विकसीत करणे या बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे.