Video : चौकीतील ओली पार्टी पोलिसांना भोवली, चौघेही निलंबित

नाशिक । प्रतिनिधी

गंगापूर परिसरातील पोलीस चौकीत ओली पार्टी करणाऱ्या त्या चार पोलिसांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. सदर घटनेतील पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान नाशिकच्या गंगापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या डी के नगर पोलीस चौकीत हे पोलीस कर्मचारी मद्य प्राशन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत हे कर्मचारी पोलीस चौकीतच मद्य प्राशन करत असल्याचे आढळून आले होते. त्यावेळी स्थानिक नागरिक तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांना हा प्रकार दिसून आला.

https://www.youtube.com/watch?v=elsOp1ATcd0

त्यावेळी त्यांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यास सुरवात केली. यावेळी मद्यपी पोलिसांनी त्या नागरिकास मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यानंतर परिसरातील नागरिक गोळा झाल्याने या पोलिसांनी पळ काढला. तर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हे प्रकरण मिटवले. मात्र या घटनेनंतर नाशिककरांनी पोलिसांवर रोष व्यक्त केला.

दरम्यान या प्रकरणी चौकशी करून तातडीने या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. तर टपरी सारख्या पोलीस चौकीत पोलीस कर्मचारी काम करत आहेत, हे देखील बरोबर नाही, म्हणून लवकरच शहरातील सर्व चौकी अद्ययावत करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.