वाढाेलीजवळ चौघेजण शिकारीच्या तयारीत होते, तेवढ्यात…

नाशिक । प्रतिनिधी

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाढोली येथील वनक्षेत्रात वाघुर लावून शिकारीचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना वन पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याकडून शिकारीचे साहित्य जप्त केले असून चाैघांनाही चार दिवसांनी वन कोठडी सुनावण्यात आली आहे.

राजेश तुकाराम दिवे, हरी अनाजी जाधव, काळू वाळू बेंडकोळी, विष्णू सोनू शिद (रा. तळ्याची वाडी, अंजनेरी, त्र्यंबकेश्वर) अशी अटकेतील चौघा संशयित शिकाऱ्यांची नावे आहेत. या घटनेमुळे वन तस्करीच्या संदर्भात ‘नेटवर्क’ असल्याबाबत वन पथकांचा तपास सुरू केला आहे. वास्तविक फेब्रुवारी महिन्यात बिबट्याच्या कातडीच्या विक्रीमुळे नाशिकमधून वन्यजीव तस्करीचे ‘नेटवर्क’ देशभरात असल्याचे स्पष्ट झाले हाेते. यात बिबट्याची कातडीसह कासव, विदेशी पक्षी यासह मृत सागरी जीवांच्या तस्करीसाठी नाशिक केंद्रबिंदू ठरत असल्याची उघड झाले हाेते.

नाशिक पश्चिमसह शहापूर, कोल्हापूरच्या वन पथकांनी नाशिकमध्ये धाडी मारल्या. त्यावेळी संशयितांना अटक केल्यानंतर त्यांचा मुक्काम कोठडीत हलविण्यात आला. त्यावेळी वनक्षेत्रातून तस्करांची नाकाबंदी करण्यासाठी पथके तैनात झाली हाेती. त्यानुसार नाशिक पश्चिमच्या वन पथकाला मंगळवारी (दि.१५) पहाटे वाढोलीच्या कक्ष क्रमांक ५२० मध्ये संशयास्पद हालचाली आढळून आल्या. त्यानुसार गस्तीवर असलेल्या पथकाने अधांरात दडून बसलेल्यांची चौकशी केली असता शिकारीचा प्रयत्न सुरु असल्याचे समजले.

दरम्यान यानंतर चारही जणांना वनपथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आठ वाघूरंसह दोन कोयते, एक विळा, एकतीस काठ्या आणि दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या वनक्षेत्रात मोर, ससा, घोरपडीसह बिबट्याचा वावर असल्याने शिकारीसाठी वाघूर लावल्याचे वनाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. . नाशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल ओंकार देशपांडे, वनरक्षक सचिन आहेर, लकडे, महाजन यांनी ही कारवाई केली.