नाशिकमधील कोरोनाची ‘ती’ थरारक दोन वर्षे, आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल

नाशिक । प्रतिनिधी

कोरोना चा संसर्ग सुरू झाल्यापासून गेल्या दोन वर्षात प्रथमच नाशिक शहरात दिवसभरात कोरोनाचा एकही रुग्णांची नोंद झाली नसल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने नाशिकरांना हैराण केले होते. मात्र गेल्या काही महिन्यापासून नाशिकसह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे गेल्या पंधरा दिवसात आतापर्यंत एकाही कोरोना रुग्णाचा बळी गेला नसून हे ही दोन वर्षात प्रथमच दिसत असल्याने नाशिककरांसाठी कौतुकाची बाब आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी फक्त एकच नवा रुग्ण आढळला असून सद्यस्थिती नाशिक शहरात 59 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

जिल्ह्यात २९ मार्च २०२० लासलगाव येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. तर ०६ एप्रिल २०२० नाशिकच्या गोविंद नगर शहरातील पहिला आढळला. त्यानंतर सुरु झालेला कोरोनाचा प्रवास फारच भयानक होता. त्यावेळी अनेक लोकांचे बळी गेले. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. त्यानंतरच्या २०२१ मध्ये दुसऱ्या लाटेने अक्षरश धुमाकूळ घालून जवळपास दीड लाखांहुन अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले तर तीन हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. यावेळी नागरिकांना बेड , औषधे शिवाय अंत्यसंस्कारासाठी देखील हेळसांड झाल्याचे पाहायला मिळाले. या दरम्यान सर्वत्र हाहाकार पाहायला मिळत होता.

अशातच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोके वर काढले. ओमायक्रोन नामक व्हेरिएंटने पुन्हा एकदा लोकांच्या मनात धडकी भारावली. या नव्या व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट आली. या लाटेत संसर्गाचा वेग अतिप्रचंड होता. मात्र बहुसंख्य रुग्ण घरीच बरे होत असल्याने रुग्णालयांवरचा ताण तुलनेने बरचस हलका झाल्याचे पाहायला मिळाला. याच दरम्यान लसीकरणाने वेग घेतल्याने मृत्यू दरही कमी झाला. आणि त्यानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली.

आत्तापर्यंत शहरातील दोन लाख ७२ हजार ७५७ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ४१०५ जणांचा बळी गेला आहे. जिल्ह्यातील कोरोना मुक्तीचे प्रमाण ९८.११ टक्क्यांवर पोहोचले असून नाशिक शहरात ते ९८.४७ टक्के एवढे आहे. नाशिक मध्ये कोरोनाच्या तब्बल तीन लाटा आल्या नंतर जवळपास दोन लाख ७६ हजार रुग्ण आढळले.

दरम्यान पावणेदोन वर्षांत प्रथमच मंगळवारी कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. विशेष म्हणजे मागील पंधरा दिवसांत एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. लसीकरण आणि नाशिकरांचा संयम यामुळे नाशिकची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. मात्र अद्यापही नियमांचे पालन गरजेचे असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बाबासाहेब नागरगोजे यांनी सांगितले. दरम्यान नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असून यामुळे नाशिककरांना एक प्रकारे दिलासा मिळत आहे. त्यामुळे लवकरच नाशिक जिल्हा कोरोना मुक्त होणार असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.