Video : नाशिक पोलीसांचं चाललंय काय? चौकीतच रंगली ओली पार्टी

नाशिक । प्रतिनिधी

गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत डी. के. नगर पोलीस चौकीमध्ये मंगळवारी (दि. १५) रात्री ११ वाजता चक्क पोलीस कर्मचाऱ्यांची ‘ओली पार्टी’ रंगली होती.अशातच चौकीत तक्रार देण्यासाठी गेलेल्या नागरिकाला मद्यपी पोलिसांकडून बेदम मारहाण झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. सदर घटनेने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान गंगापूरच्या डी के नगरच्या परिसरातील एक स्थानिक नागरिक टवाळखोर त्रास देत असल्याची तक्रार करण्यासाठी गेले. मात्र पोलिसच दारू पिताना आढळून आल्याने त्यांचेही डोके चक्रावले. यावेळी रात्री अकच्या सुमारास ५ ते ६ पोलीस कर्मचारी ओल्या पार्टीत दंग झाले होते. त्यांनी तक्रारदारास आत बोलावून लाईट बंद करून मारहाण केली, असे परिसरातील काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.

यावेळी एका नागरिकाने हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद करण्यास सुरवात केली. त्याचवेळी एका मद्यपी पोलिसाने शिवीगाळ करत पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी पाठलाग करत त्याला रोखले. त्याचे मोबाइल चित्रीकरण केल्यानंतर तो चौकीत परत आला.

या गोंधळानंतर घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांच्यासह वरिष्ठ अधिकारी दाखल झाले होते. शिंदे यांनी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठल्यानंतर उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.