नाशिक पोलिसांकडून विनाहेल्मट चालकांवर कारवाईचा बडगा

नाशिक । प्रतिनिधी

पोलीस आयुक्तालयाने सुरु केलेल्या हेल्मेटसक्ती मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी ४१२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या वाहनचालकांकडून सुमारे दोन लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.

अपघाताला आळा बसावा, यासाठी नाशिक पोलिसांनी हेल्मेट सक्तीची मोहीम अधिक कडक केली असून गुरुवारपासून सुरु झालेल्या या मोहिमेद्वारे पोलिसांनी विना हेल्मेट धारकांवर चांगलाच चाप बसविला आहे. हेल्मेटसक्तीच्या दुसऱ्या दिवशी पंचवटी, आडगाव, दिंडोरी नाका, महसुल परिसरात १३५ चालकांवर कारवाईचा बडगा उगारला. तर नाशिकरोड परिसरात ८० दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात येऊन चाळीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हेल्मेट सक्ती मोहिमे अंतर्गत सुमारे ८० चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

दरम्यान विना हेल्मेट चालकांवर पोलिसांचा कारवाईचा सपाटा सुरूच असून सलग दुसऱ्या दिवशी ४१२ विना हेल्मेट चालकांना दंड ठोठावला आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करावे याबाबत वाहनचालकांना सूचित करण्यात येत आहे. तसेच हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकी चालकांना पोलीस ठाणे व शासकीय कार्यालयाच्या आवारात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस आयुक्त दीपक पांडेय अधिक आक्रमक झाले असून हेल्मेट सक्ती मोहीम अधिक कडक करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. या मोहिमेत दुचाकीचालकांकडून दंड वसूल करण्यात येत असून सलग दुसऱ्यांदा विना हेल्मेट आढळल्यास थेट तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द ची कारवाई केली जात आहे.