‘बाबा, तुम्ही वडाला आणि त्यांच्या फ्रेंड्सना मरू दिलं..!

नाशिक । गोकुळ पवार
‘काय सांगताय बाबा’, ‘आपल्या नाशिकमध्ये बर्ड्स होते’, ‘मग तुम्ही काय करत होतात तेव्हा’, ‘तुम्ही का नाही वाचवलंत या झाडांना’…! असे असंख्य प्रश्न एक चिमुरडी आपल्या बाबांना विचारत आहे, होय, झाडांची कत्तल अशीच सुरु राहिली तर एक दिवस नाशिककरांना या संवादांना सामोरे जावे लागणार आहे. हा प्रश्नरुपी संवाद उपस्थित केला आहे, नाशिकमधील पर्यावरण प्रेमी रोशन केदार आणि त्यांच्या टीमने…!

झालंय हि असच आहे, नाशिकमधील सिडको परिसरात गेल्या अडीचशे वर्षांपासून सावली देणाऱ्या एका वटवृक्षाला उडाणपूल बांधण्यासाठी धडावेगळं केले जात आहे. गेल्या अडीचशे वर्षांपासून नाशिककरांना सावली देणारा, पावसात आधार देणारा वटवृक्ष आज मात्र मानवापुढे झुकला आहे. त्रिमूर्ती चौक ते सिटी सेंटर दरम्यान होणाऱ्या उड्डाणपुलासाठी उंटवाडीच्या कडेला असलेल्या या वटवृक्षावर कुऱ्हाड चालविण्यात येत आहे. यामुळे नाशिकमधील पर्यावरण प्रेमींनी याबाबत आवाज उठविण्यास सुरवात केली आहे.

‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’ अशी बिरुदे असलेल्या नाशिक शहराला एक वेगळी ओळख आहे. आजही अनेकांना नाशिकची भुरळ पडली आहे. इथले थंड हवामान, जैवविविधतेने नटलेला निसर्गरम्य परिसर मनाला सुखद अनुभव देतो. एकेकाळी नाशिकला हरीत नाशिक म्हणून ओळख होती. मात्र अलीकडच्या काळात हे चित्र बदलले आहे. गेल्या काही वर्षात शहरातील अनेक वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. मोठमोठ्या इमारती, रस्ते, विकासाच्या नावाखाली चाललेली वृक्षांची कत्तल हे उद्याचे भकास नाशिकचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे.

आज ज्या पद्धतीने उंटवाडी येथील प्राचीन वटवृक्षांवर कुऱ्हाड चालवली जात आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षात वृक्ष संपविण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षी १६१ हेरिटेज वृक्षांच्या तोडीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर शहरात वाहतुकीला अडथळा ठरणारे अकराशे झाडे तोडण्यासंदर्भात देखील प्रशासनाने घाट घातला होता. विशेष म्हणजे चुंचाळे परिसरात नवं शहर उभं करण्यासाठी तब्बल २ लाखाच्या आसपास झाड तोडण्यात येणार होती. या अशा पद्धतीने वेळोवेळी विकासाच्या नावाखाली वृक्षांना नष्ट करण्यात येत असल्याने हरित नाशिकचे भवितव्य धोक्यात आले आहे. मात्र नाशिककर चिडीचूप आहेत. सेव्ह ब्रम्हगीरी, सेव्ह पांजरापोळ, सेव्ह नाशिक या सारख्या मोहीम सुरु झाल्या पाहिजेत, अन्यथा ‘बाबा नाशिकमध्ये बर्ड्स होते’ हे विचारणारा दिवस दूर नाही…

नाशिक हा जैविविधतेने नटलेला परिसर आहे. आजही नाशिकमध्ये लाखोंच्या संख्येने वृक्ष पाहायला मिळतात. मात्र या वृक्षांची हळहळू संख्या कमी होताना दिसून येत आहे. नाशिकमधील हे वृक्ष नाशिकरांचा ‘ऑक्सिजन प्लांट’ आहेत, म्हणजे ही इको सिस्टीम असून ती संपविण्याचा घाट घातला जातोय, नाशिककरांनी हे वेळीच ओळखून आवाज उठवणे आवश्यक आहे. अन्यथा, हा संपत चाललेला ऑक्सिजन एक दिवस तुम्हाला व्हेंटिलेटरवर घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही.