अखेर डिसले गुरुजींचा रजेंचा अर्ज मंजूर

नाशिक । प्रतिनिधी
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा डिसले गुरुजींना दिलासा दिला असून सर्व त्रुटी दूर करून डिसले गुरुजींना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची परवानगी देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

परितेवाडी जिल्हा परिषद शाळेचे (Paritewadi ZP School) ग्लोबल टीचर पुरस्कार (Global Teacher Award) विजेते शिक्षक रणजित डिसले (Ranjeet Disle) यांनी अमेरिकेत पीएच.डी. मिळविण्यासाठी रजेची मागणी केली होती. यामुळे दोन दिवसांपासून डिसले गुरुजी आणि शाळा व्यवस्थापन यांच्यामध्ये वाद सुरु होते. येथील शिक्षणाधिकारी (Education Officer) डॉ. किरण लोहार यांनी तुम्ही शाळेचे काय करणार? असा सवालही उपस्थित केला होता. मात्र आता डिसले गुरुजींचा अमेरिका जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे हे प्रकरण गेल्यानंतर त्यांनी तातडीने सोडविले आहे. मंत्री गायकवाड यांनी स्थानिक शिक्षण विभागाशी संपर्क साधत हे प्रकरण मार्गी लावले आहे. सर्व त्रुटी दूर करून डिसले गुरुजींना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची परवानगी देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. डिसले गुरुजींचा रजेचा अर्ज मंजूर करण्याचे शिक्षण विभागाला आदेश दिले आहेत.

दरम्यान डिसले गुरुजींना अमेरिकन सरकारकडून शिक्षकांसाठी दिली जाणारी फुल प्रेस स्कॉलरशिप मिळाली आहे. त्यामुळे त्यांना २०२२ च्या ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत अमेरिकेत पिस इन एज्यूकेशन या विषयावर अधिक सखोल संशोधन करावे लागणार आहे. त्यासाठीच डिसले गुरुजींनी प्रशासनाकडे अध्ययन रजेचा अर्ज केला होता.