नाशकात दम’धार’ पाऊस; धरणसाठ्यात वाढ

By Pranita Borse

नाशिक: नाशिकमध्ये (Nashik) कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ झाली आहे. जून महिन्यात दांडी मारलेल्या पावसाने काल सकाळपासून जोरदार हजेरी लावली त्यामुळे गंगापूर (Gangapur dam), दारणा (Darna dam), भावली आणि पालखेड या धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात बहुतांश धरणात पाण्याने तळ गाठला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. शहराला पाणी कपातीच्या संकटाला सामोरं जावं लागणार असल्याची देखील चर्चा सुरू होती. मात्र, काल झालेल्या दमदार पावसामुळे गंगापूर, दारणा, भावली (Bhavali dam) आणि पालखेड या धरणांतील पाणीसाठा वाढला असून नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.

गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ

नाशिक शहराची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात पाण्याने तळ गाठला होता. ३० जुलैपर्यंत पुरेल एवढंच पाणी धरणात शिल्लक होतं. त्यामुळे येत्या सोमवारी पाणी कपातीचा निर्णय होण्याची देखील शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे गंगापूर धरण ३७ % भरलं आहे. त्यासोबतच दमदार पावसामुळे दारणा धरणाची देखील पाणी पातळी वाढली असून धरण ४४ टक्के भरल्याने मोठा दिलासा मिळत आहे.

जिल्ह्यात पावसाची दम’धार’ हजेरी

नाशिक शहरासोबत जिल्ह्यात देखील पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. पावसाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरी (Igatpuri) त्यासोबतच त्र्यंबकेश्वरमध्ये (trimbakeshwar) देखील पावसाची सर्वाधिक नोंद झाली आहे. नाशिकमध्ये ६० मिलिमीटर, त्र्यंबकमध्ये ९२ मिलीमीटर तर इगतपुरीमध्ये ९३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. असं असलं तरी ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

गोदामाई खळखळली

नाशिकमध्ये काल सकाळपासूनच पावसाने जोर लावून धरला होता. पावसाची संततधार सुरू असल्यामुळे गोदावरी नदीची(Godavari river) पाणी पातळी वाढली आहे. नदीला जोडणाऱ्या नाल्यांच पाणी, शहरातील रस्त्यांवरील पाणी नदीपात्रात आल्याने गोदावरी नदीच्या नदीला पूर आल्याचे दिसून येत आहे. यामुळे नाशिक जिल्हा आणि मनपा प्रशासनाकडून देखील नदीकाठच्या लहान-मोठे विक्रेते, दुकानदार, टपरिधारक आणि नदी काठच्या नागरिकांना नदी काठापासून दूर राहण्यासाठी आव्हान केले जात आहे. अशात आणखी काही दिवस हवामान खात्याने नाशिकला संततधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा प्रशासन (Nashik District Administration) आणि मनपा प्रशासनाकडून (Nashik NMC) देखील खबरदारी घेतली जात आहे.