नवरदेवाची वरात,पोलिसांच्या दारात !

हळदीला वाजवीले वाद्य अन मांडवात धडकले पोलीस अशी गमतीशीर घटना घडली आहे.पोलिसांनी चक्क ढोल-ताशा जप्त केला असून विना परवानगी वाद्य वाजविल्याप्रकरणी नवरदेवासह वाजंत्री विरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

लग्नबेडीत चतुर्भुज झालेल्या नवरदेवाला आता पोलिसांचाही बेडीत अडकावं लागणार असल्याच्या गमतीशीर चर्चेनं हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलंय .
शुभमंगलच्या पूर्व संध्येल्या ढोल-ताशांच्या गजरात रंगलेल्या हळदीच्या कार्यक्रमाला अचानकपणे पोलीस येऊन धडकले अन लग्नघरी पडलेल्या मांडवात एकच सन्नाटा पसरला. विनापरवानगी वाद्य वाजवून गर्दी जमवत कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी वाजंत्रीसह नवरदेव आणि विरपित्यांस पोलीस ठाण्यात आणले.

गंगापूररोडवरील पोलिस आयुक्त कार्यालयासमोर मल्हारखान झोपडपटट्रीमध्ये जोरजोरात ढोल आणी ताशा ही पारंपरिक वाद्ये बडविली जात होती. मोठ्या प्रमाणात गर्दीही जमली होती. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जाधव हे त्यांच्या पथकासह मल्हारखान झोपडपट्टीत दाखल झाले. अचानकपणे पोलीस वाहनाचा सायरन कानी येताच लग्नघरी पडलेल्या मांडवात शांतता पसरली. पोलिसांनी संशयित इसम नवरदेव प्रसाद संतोष बुकाने याच्याकडे वाद्ये वाजविण्याची परवानगीबाबत विचारणा केली असता बुकाने यांनी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. प्रसाद यांच्या हळदीचा कार्यक्रम याठिकाणी सुरू होता. हळदीच्या कार्यक्रमासाठी मोठया प्रमाणावर गर्दी जमलेली होती, असे पोलिसांनी सांगितले…

पोलिसांनी तात्काळ वादय वाजविणारे वाजंत्री तसेच नवरदेवासह विरपित्यास ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणले. तेथे त्यांना समज देत विनापरवानगी कार्यक्रमाचे आयोजन करून कोविड-१९ बाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्याने नवरदेव संशयित प्रसाद संतोष बुकाने त्याचे वडील संशयित संतोष बुकाने आणी वादय वाजविणारे सहा इस्माविरुद्ध भादंवि कलम १८८नुसार गुन्हा दाखल केलाय.