शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची नाशिकच्या सातमाळा पर्वत रांगेतील विस्तीर्ण दुर्गांवर १४६ वी दुर्गसंवर्धन श्रमदान मोहीम झाली.या मोहिमेत किल्ल्यांवरील माथ्यावरील भग्न,पडक्या वाड्यातील अस्ताव्यस्त दगड रचून,त्याला भरावा टाकून त्यातील काटेरी झुडपे काढण्यात आली.तसेच १५१ झाडांचे आळे खोदून तयार करून त्यांना पाणी घालण्यात आले.एकूणच भव्यता लाभलेल्या दुर्गांची ऐतिहासिक वास्तूंची हेळसांड बघून दुर्गसंवर्धकानी राज्य सरकार व वनविभागाच्या कार्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिकच्या उत्तरेस समुद्र सपाटीपासून ४००० फूट उंचीचा प्रशस्त व्यासाचा अहिवंत किल्ला आहे.सातवाहन काळातील भक्कम बांधणी असलेला हा दुर्ग आजच्या स्थितीत भग्न,दुर्लक्षित अवस्थेत आहे.अहिवंत किल्ल्याचे इतिहासातील स्थान मोठे आहे.या किल्ल्याच्या चारही बाजूने टेहळणीचे बुरुज व सैनिकांचे जोते आहे,किल्ल्यांवर खंडेराव महाराजांचे,देवीच्या जुन्या मुर्त्या आहे,पाण्याने भरगच्च भरलेले २ तळे व स्वच्छ पाण्याचा कुंड,टाके,व किल्ल्यांवर शेकडो सैनिकांचे जोते(घरांच्या उध्वस्त खुणा)आहेत,जुने भव्य वाड्यांचे जमीनदोस्त वास्तू व माथ्यावर असलेले माचीवरील जुन्या पडक्या इमारती,कोरीव पायऱ्या,गोलाकार मार्ग,माथ्यावर ध्वज स्तंभ,लागूनच दक्षिणेस बुधल्या दुर्ग असा परिपूर्ण असा ऐतिहासिक पाऊलखुणा असलेला हा किल्ला आहे.नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक दुर्ग असतांना स्थानिक लोकप्रतिनिधी व राज्य सरकारचे वनखाते,पुरातत्व,महसूल यंत्रणेच्या दुर्लक्षाने हा ऐतिहाशिक ठेवा दुर्लक्षित आहे,याबाबत हजारो पत्रे संबंधित विभागास,शासनास लिहिले मात्र दुर्गांची व्यथा ही मंडळी समजणार कधी?हाच सवाल शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ यांनी या किल्ल्यावरील दुर्ग संवादात व्यक्त केला.