लग्न समारंभाला ५०, तर अंत्यसंस्कारांसाठी २० जणांना परवानगी

नाशिक । प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाटयाने वाढ होत आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आजपासून राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नव्या नियमावलीनुसार लग्नसोहळे, सभा, संमेलनासाठी केवळ ५० व्यक्तींची मर्यादा ठेवण्यात आली आहे.

दरम्यान कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काल सायंकाळी टास्क फोर्सची बैठक झाली. यामध्ये राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानंतर उशिरा मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती यांनी नवी नियमावली जाहीर केली आहे.

राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून राज्यात नवे निर्बंध लागू असणार आहेत. राज्यातील कोरोनाचा वाढता फैलाव पाहता राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी संध्याकाळी दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्बंधांबाबत अंतिम निर्णय घेतील, असं सांगतानाच हे निर्बंध आज-उद्या लागू होतील, असंही ते म्हणाले होते. त्यानुसार गुरुवारी रात्री उशिरा राज्य सरकारकडून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

अशी आहे नवी नियमावली.

खुल्या जागेत अथवा बंदिस्त सभागृहात होणाऱ्या लग्न सोहळ्यांना केवळ ५० व्यक्तींनाच परवानगी.

धार्मिक सांस्कृतिक राजकीय व इतर सभा, संमेलनसाठीही हजेरी लावण्यासाठी फक्त ५० जणांना मुभा.

अंत्यविधीसाठी २० व्यक्तींची मर्यादा . पर्यटनस्थळे उद्याने, समुद्रकिनारे, अथवा सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास मनाई.