डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमधील झिंगाट पार्टी भोवणार, आयुक्तांचे चौकशीचे आदेश

नाशिक | प्रतिनिधी

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील (Dr. Zakir Hussain Hospital) काही कर्मचार्‍यांकडून इमर्जन्सी वॉर्डमध्ये उघडपणे सुरू असलेले मद्यपान आणि रुग्णालयात दोन दिवसांपासून सुरू असलेले चित्रपटाचे चित्रीकरण (Cinema Shooting) यामुळे रुग्ण हैराण झाल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर आता पालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार (NMc Commissioner Ramesh Pawar) यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

दोन दिवसापूर्वी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात अतिदक्षता विभागात काही कर्मचाऱ्यांनी मद्य पार्टी केल्याचे समोर आले आहे. त्यातच या वार्डमध्ये एका चित्रपटाचे शुटिंगही सुरु आहे, ते हि रात्रभर. यामुळे येथील रुग्ण वर्ग हैराण झाल्याची तक्रार प्रशासनास प्राप्त झाली. त्यानुसार येथील या सर्व झिंगाट प्रकारच्या चौकशीचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

दरम्यान या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिका वैद्यकीय विभागाने (Nashik NMC) शुक्रवारी या प्रकरणी चौकशी सुरू केली, मात्र आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांमार्फत कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात मद्यपान करणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती घेतली जात आहे. अतिरिक्त आयुक्तांकडून चौकशी केली जाणार असून दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निलंबन केले जाईल. – डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक