नाशिककर सावधान! कोरोना अजून गेलेला नाही!

नाशिक | प्रतिनिधी
एकीकडे नाशिककर निर्धास्त झोपले असताना कोरोना हळू हळू पाय पसरतो आहे. कारण मागील काही दिवसांत कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ झाली असून बरे होणाऱ्यांपेक्षा दुपटीने बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे.

कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्वजण एकदम निर्धास्त होत शहरात वावरत आहेत. मात्र कोरोना संसर्गाच्या बाबतीत नाशिककरांची काळजी पुन्हा वाढू लागली आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.

गेल्या २४ तासात जिल्ह्यात ७७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यातील शहरात ४४ तर ग्रामीण भागात ३३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यात सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

नाशिक मध्ये रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होत असल्याने आरोग्य विभाग अलर्ट वर असून नाशिककरांनी घाबरू नये. पण काळजी मात्र पुन्हा पूर्वीप्रमाणे घ्यावी लागणार असल्याचे मत आरोग्य विभागाने व्यक्त केले आहे.